Amol Mitkari React on Rohit Pawar Meets Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२५ नोव्हेंबर) कराड येथील प्रीतीसंगमावर जाऊन महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. यावेळी अजित पवार व कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांची भेट झाली. या भेटीवेळी रोहित पवार अजित पवारांच्या पाया पडले. त्यानंतर अजित पवार रोहित पवारांना “शहाण्या थोडक्यात वाचलास” असं म्हणाले. दरम्यान, अजित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे (रोहित पवारांच्या विरोधात उभे राहिलेले भाजपाचे उमेदवार) यांच्या प्रचारासाठी सभा घेतली असती, एखाद्या सभेला संबोधित केलं असतं किंवा प्रचार केला असता तर रोहित पवार पराभूत झाले असते असं स्वतः राम शिंदे म्हणाले आहेत. यावर रोहित पवार म्हणाले, “कदाचित उलटा निकाल लागला असता. मात्र, अजित पवार बारामतीत अडकून पडले होते”.
शरद पवारांनी अजित पवारांविरोधात घरातील उमेदवार (युगेंद्र पवार) दिला होता. तसेच मतदारसंघात स्वतः प्रचार केला होता. त्यामुळे अजित पवारांना यंदा राज्यातील इतर मतदारसंघांपेक्षा बारामतीत अधिक लक्ष घालावं लागलं. यावरून रोहित पवारांनी अजित पवारांना चिमटा काढला.
हे ही वाचा >> विधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार? राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “महाराष्ट्र व मुंबईसाठी…”
या भेटीवेळी अजित पवार रोहित पवारांना म्हणाले होते की “तुझ्या मतदारसंघात माझी एखादी सभा झाली असती तर तुझी अडचण झाली असती, शहाण्या थोडक्यात वाचलास”. यावरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी रोहित पवारांना प्रतिक्रिया विचारली असता रोहित पवार म्हणाले, “नक्कीच, अजित पवारांची माझ्या मतदारसंघात सभा झाली असती तर काही प्रमाणात मतं वर खाली झाली असती. कदाचित उलटा निकाल देखील लागू शकला असता. परंतु, अजित पवार हे बारामतीत अडकून पडले होते. त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही.
हे ही वाचा >> देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? भाजपा नेत्याचा दुजोरा, एकनाथ शिंदेंचं काय? म्हणाले, “भाजपाचा स्ट्राईक रेट..”
रोहित पवारांनी अजित पवारांना चिमटा काढल्यानंतर अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्यावर हा (रोहित पवार) किती खोटं बोलतोय. बारामतीमध्ये पाय धरून काका माझ्या मतदारसंघात येऊ नका ही विनंती करुन, आज मस्तीत बोलतोय. जय पवार, पार्थ पवार यांच्यापैकी कोणी एक जरी कर्जत-जामखेडमध्ये फिरला असता तरी याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता. खोटारडा!”