Shyam Manav Breaking News : भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांच्या एका दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ चालू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना त्यांच्यावर दबाव टाकला होता. “फडणवीसांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांना तुरुंगात टाकण्याचा डाव रचला होता.” असं श्याम मानव यांनी म्हटलं होतं. मानव यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. पाठोपाठ माजी गृहमंत्री व विद्यमान आमदार अनिल देशमुख यांनी देखील मानव यांच्या दाव्यांना दुजोरा दिला. तसेच देशमुख म्हणाले, “माझ्याकडे यासंबंधीचे पुरावे आहेत.”

श्याम मानव म्हणाले, “अनिल देशमुख गृहमंत्री असतानाच त्यांच्यावर ईडीने कारवाई सुरू केली होती. त्याच काळात काही लोकांनी देशमुखांना सांगितलं की तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून स्वतःला सोडवायचं असेल, तर तुम्ही १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावं. तसेच दिशा सालियन बलात्कार आणि हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घ्यावं. बेकायदेशीर व्यवहार आणि आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी अनिल परब यांचं नाव घ्यावं. मात्र देशमुखांनी तसं केलं नाही.”

माझ्याकडे पुरावे आहेत : अनिल देशमुख

श्याम मानव यांनी केलेल्या दाव्यांनंतर प्रसारमाध्यमांनी थेट अनिल देशमुखांकडे याबाबत विचारणा केली. त्यावर अनिल देशमुख म्हणाले, “मला त्यांनी (देवेंद्र फडणवीस) तीन ते चार प्रतिज्ञापत्रं लिहून द्यायला सांगितली होती. मात्र मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी कोणावरही खोटे आरोप करणार नाही. त्यानंतर त्यांनी ईडी व सीबीआयला माझ्या मागे लावून मला अटक करायला लावली. तसेच श्याम मानव यांनी केलेला आरोप खरा आहे. माझ्याकडे त्यासंबंधीचे पुरावे देखील आहेत.”

Shyam Manav on Devendra Fadnavis
श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

हे ही वाचा >> कॅबिनेट बैठकीत अजित पवार-गिरीश महाजनांमध्ये निधीवरून खडाजंगी? महाजन म्हणाले, “मी माझ्या खात्यासाठी…

श्याम मानव तुतारी गटात जाणार : मिटकरी

दरम्यान, श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपामधील नेत्यांनी श्याम मानव यांना ‘सुपारीबाज’ म्हटलं आहे. श्याम मानव सुपारी घेऊन फडणवीसांविरोधात बोलत असल्याचा आरोपही भाजपाकडून होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. मिटकरी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, “महाराष्ट्रातील बुद्धिजीवी म्हणून ओळखले जाणारे अनिसचे प्रमुख, प्राध्यापक श्याम मानव सर लवकरच तुतारी गटात (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) अधिकृत प्रवेश करून विधानसभेत उमेदवारी घेतलेले दिसतील.”

Story img Loader