अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी केली आणि ते भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने स्थापन केलेल्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. महायुतीत सहभागी होताना अजित पवार आपल्याबरोबर राष्ट्रवादीच्या अनेक आमदार आणि खासदारांना घेऊन गेले आहेत. रविवारी (२ जून) अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर त्यांच्याबरोबर ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुळात भाजपा-शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे वेगवेगळ्या विचारांचे पक्ष असल्याने या युतीत त्यांच्यात मतभेद होतील, तणाव निर्माण होईल अशी शक्यता आतापासूनच वर्तवली जात आहे. अशातच यावर आता आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, प्रत्येक पक्षाची वेगवेगळी मतं असू शकतात. तो त्या-त्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही सेक्युलर आहे. आमची शिव-शाहू-आंबेडकरवादी भूमिका आहे. आमची तत्वं आमच्याजवळ, भाजपाने भाजपाची तत्वं पाळावी. यावेळी मिटकरी यांना भाजपाच्या हिंदुत्ववादी भूमिकांविषयी विचारल्यावर अमोल मिटकरी म्हणाले, मी ही हिंदू आहे. मी ही हिंदुत्ववादीच आहे. परंतु ते (भाजपा) सांगतील ते हिंदुत्व कसं? असा प्रश्नही मिटकरी यांनी यावेळी उपस्थित केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, आम्ही सत्तेकरता सोबत आहोत. समजा आमची युती आहे. परंतु एखादं मॉब लिंचिंग करणे, एखाद्या समाजाविरोधात काहीतरी बोलणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नसेल. त्यांच्या भूमिका त्यांना लखलाभ.
हे ही वाचा >> राष्ट्रवादीत किती आमदार उरले? जयंत पाटलांनी सांगितली नेमकी आकडेवारी
भारतीय संविधानाला, लोकशाही मूल्याला छेद देणाऱ्या घटना घडल्या तर आमचं मत आम्ही मांडू. आमच्या पक्षश्रेष्ठींना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. उदाहरणार्थ कोणी नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. आम्ही त्यास मान्यता देणार नाही. नथूराम गोडसे देशभक्त असूच शकत नाही. ही आमची भूमिका अगदी सुरुवातीपासून आहे. आम्ही आमच्या विचारांशी तडजोड करणार नाही. जर कधी आमच्यात दुमत असेल, विरोधाभास असेल तर आम्ही त्यांना समज देऊ किंवा प्रेमाने समजावून सांगू. मी थोडा प्रेमाने समजावून सांगेन.