महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून सतत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या दादरमधील मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी शरद पवारांवर जातीयवादी असल्याची टीका केली. त्यानंतर १२ तारखेला ठाण्यातील उत्तरसभेमध्ये पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला. तर महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी राज ठाकरेंनी औरंगाबादमधील सभेमध्ये केवळ राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरेंकडून होणाऱ्या या टीकेला शरद पवारांपासून ते राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही अनेकदा उत्तरं दिली आहेत. अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर सोमवारी शरद पवारांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये राज ठाकरेंवर पवारांवरील टीकेवरुन निशाणा साधला. असं असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत काही वर्षांपूर्वी राज ठाकरे शरद पवारांबद्दल जाहीरसभेमध्ये शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यांची आठवण करुन दिलीय.

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी मराठी माणूस या मुद्द्यावरुन परप्रांतीयांना विरोध करण्याची भूमिका स्वीकारली होती. यावेळी केलेल्या एका भाषणामध्ये राज ठाकरेंनी शरद पवारांचा आदरपूर्वक उल्लेख केलेला. हाच व्हिडीओ मिटकरींनी शेअर केलाय. “महाराष्ट्राचा विकास कुणी केला? असा प्रश्न एकेकाळी भाजपाकडून विचारला जात होता त्यावेळी या देशातील महान अभ्यासू नेते राज ठाकरे यांनी दिलेले अभ्यासपूर्ण उत्तर जरूर ऐका,” अशा कॅप्शनसहीत मिटकरींनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

राज काय म्हणतायत व्हिडीओत?
मिटकरींनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये राज ठाकरे परप्रांतीयांवर टीका करताना, “तुम्ही म्हणताय की हा विकास आम्ही केला. तुम्ही कसा केला? आमच्या यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत आणि बाळासाहेब ठाकरेंपासून विलासरावांपर्यंत आमच्या मराठी नेत्यांनी हा महाराष्ट्राचा विकास केला. म्हणून लेकांनो तुम्ही इथे आलात ना? बाकीच्या राज्यात का नाही गेलात?”, असं म्हणताना दिसत आहेत.

मिटकरी यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari shared old video of raj thackeray saying sharad pawar was among who develop maharashtra scsg