राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर संविधानाचा संदर्भ देत शरद पवार यांची भूमिका कायमच जातीयवाद पसरवणारी आणि समाजात तेढ निर्माण करणारी राहिल्याचा आरोप फडणवीस यांनी ट्विटवरुन केलाय. फडणवीस यांनी १४ ट्विट्सच्या माध्यमातून पवारांवर निशाणा साधलाय. बाबासाहेबांच्या विचारांची आठवण फडणवीसांनी शरद पवारांना ट्विटसच्या माध्यमातून करुन दिली आहे. पवारांनी २०१३ पासून वेगवेगळ्या मुद्द्यावर वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांवरुन फडणवीसांनी टीका केलीय. यामध्ये इशरत जहाँ प्रकरण, मुस्लिमांना आरक्षण देण्याचा मुद्दा, कश्मीर फाइल्स चित्रपट, कलम ३७० संदर्भातील पवारांची भूमिका यावरुन फडणवीसांनी टीका केलीय. मात्र फडणवीस यांनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्याने उत्तर दिलं आहे.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: ‘हिंदू टेरर’चा पहिल्यांदा वापरणारे ते मुस्लिमांना…; फडणवीसांचे सर्वच्या सर्व १४ ट्विट्स जसेच्या तसे
राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रसरामाध्यमांसाठी जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये बाबासाहेबांनी घटना समितीसमोर केलेल्या भाषणाचा संदर्भ वाचून दाखवत फडणवीसांवर निशाणा साधलाय. “आपल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनामध्ये समता नाकारणार आहोत? आणि जर ती आपण यापुढे अधिक काळ नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. ही धोक्याची घंटा बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीसमोर २५ नोव्हेंबर १९४९ रोजी केलेल्या भाषणामधून दिली,” असा संदर्भ मिटकरी यांनी ‘महामानव’ या पुस्तकातून वाचून दाखवत फडणवीसांवर टीका केली.
नक्की वाचा >> “एकीकडे जय भीम म्हणायचे आणि आतून मनुस्मृतीचा…”; “फडणवीस आयुष्यभर हेच करणार आहात का?”, आमदाराचा सवाल
मिटकरींनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये, “याचा अर्थ स्पष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते समताप्रिय आहे. मात्र संघाच्या मुशीत तयार झालेल्या देवेंद्र फडणवीसांना या देशात संविधान नको आहे. तर फडणवीस संविधानप्रेमी असते तर दिल्लीच्या जंतरमंतरवर संविधान जाळलं गेलं त्यावेळेस भाजपा आणि फडणवीसांनी तोंड उघडण्याची हिंमत दाखवली असती,” असा टोला लगावलाय.
“मात्र आता १४ टिट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर तोंडसुख घेऊन मुस्लिमांविरोधात जे काही वक्तव्य केलं आहे त्यावरुन फडणवीसांना प्रश्न आहे की जर तुम्ही मुस्लीमविरोधी आहात तर शहनवाज हुसैन आणि मुख्तार अब्बस नखवी हे तुमच्या पक्षात काय करतायत? तुम्हाला मुस्लिमांबद्दल इतकाच द्वेष आहे तर याचा अर्थ तुम्हाला संविधान मान्य नाही,” असा टोला मिटकरींनी लगावला आहे.
“या देशात आज आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय. तुम्ही सुद्धा बेगडीपद्धतीने जयंती साजरी केली. देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून माझा आरएसएसला (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला) थेट प्रश्न आहे की तुम्हाला देशात संविधान नको आहे का?, जर संविधान नको असेल आणि त्याविरोधात तुम्ही कारवाया करत असाल तर येणाऱ्या काळात देशातील जनता तुम्हाला उत्तर देणार,” असंही मिटकरींनी म्हटलंय.