राज्याच्या राजकारणामध्ये हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. असं असतानाच सोमवारी राज्याचे विरोधी पक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील ठाकरे सरकारवर वेगवेगळ्या विषयांवरुन निशाणा साधलाय. यामध्ये हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्याच्याही समावेश होता. हनुमान चालिसा पठण करण्याच्या मुद्द्यावरुन राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याबद्दल संताप व्यक्त करत फडणवीसांनी पत्रकार परिषदेतच हनुमान चालिसा म्हणून दाखवली. मात्र आता याच हनुमान चालिसा पठवणावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी निशाणा साधलाय.

फडणवीस काय म्हणाले?
 मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी मनसे व भाजपाने केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. त्यावर बहिष्कार घातल्याचे जाहीर करून पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हिंदूधर्मीयांनी नवरात्री, गणेशोत्सवासह अन्य सण व कार्यक्रमांमध्ये याबाबतच्या अटी व निर्बंधांचे पालन केले आहे, तसे आता मुस्लीमधर्मीयांनीही करावे, असं फडणवीस भोंग्यांबद्दलची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले.

हनुमान चालिसासंदर्भात काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यापुढे हनुमान चालिसाचे पठण करण्याचे जाहीर केल्याने देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.महाराष्ट्रात हनुमान चालिसाचे पठण केल्याने राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यासह प्रत्येक भाजपा कार्यकर्ता हनुमान चालिसाचे पठण करेल, हिंमत असेल तर त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून दाखवा, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. यावेळी त्यांनी हनुमान चालिसाही म्हणून दाखवली. 

फडणवीस यांना मिटकरींचा टोला
मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या मिटकरींनी यावरुनही ट्विट करत फडणवीसांनावर निशाणा साधलाय. “आदरणीय देवेंद्रजी हनुमान चालिसातील बर्‍याच ओळी चुकल्या आहेत. संपुर्ण चालिसा माहीत करून घ्यायचा असेल तर राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात एकदा हजेरी लावून पुर्ण पाठ करून घ्यावा ही विनंती,” असं ट्विट मिटकरींनी केलंय.

यापूर्वी अमोल मिटकरींनीही काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेमध्ये भाषणाच्या वेळी हनुमान चालिसा म्हणून दाखवली होती.

Story img Loader