Amol Mitkari Share Harshvardhan Patil Old Interview Clip : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ च्या काही महिने आधी राज्यातील अनेक विरोधी पक्षांना गळती लागली होती. तसेच भाजपात मेगाभरती चालू होती. याच काळात, काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी ११ सप्टेंबर रोजी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला इंदापुरात मोठा धक्का बसला. मात्र हर्षवर्धन पाटील आता मागे वळले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सोडून महायुतीत (भाजपा) गेलेले पाटील आता मविआत परतणार आहेत. “जनतेचा आवाज एकच आहे मी निवडणूक लढवली पाहिजे. मी ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटलो, त्यांनीही मला सांगितलं की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. शरद पवारांनी मला विचारलं तुम्ही काय निर्णय घेणार? तुम्ही भाजपात आहात. जनतेचा आग्रह आहे तर तुम्ही निर्णय घ्या. बाकी गोष्टींची काळजी मी घेईन”. असं सांगत हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.

पाटील उपस्थितांना म्हणाले, “हा कार्यक्रम संपल्यानंतर मी पत्रकार परिषद घेईन. त्यानंतर निर्णय जाहीर करेन. तुम्ही सांगा राष्ट्रवादीत जायचं का?” त्यावर उपस्थितांनी ‘होय’ आणि ‘रामकृष्ण हरी वाजवा तुतारी’च्या घोषणा दिल्या. हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार असल्याची अप्रत्यक्ष घोषणाच त्यांनी यावेळी केली.

अमोल मिटकरींचा चिमटा

पाटील महायुती सोडून मविआत परतणार असल्याचं वृत्त जाहीर होताच महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. तर, महायुतीमधील नेत्यांनी ही बातमी महायुतीसाठी चांगली नसल्याचं म्हटलं आहे. काहींनी पाटलांचा निर्णय चुकल्याचं वक्तव्य केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) विधान परिषदेतील आमदार व प्रवक्ते अमोल मिटकीर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी यांनी हर्षवर्धन पाटलांच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत पाटलांना चिमटा काढला आहे.

आयाराम की गयाराम? मिटकरींचा हर्षवर्धन पाटलांना प्रश्न

या जुन्या मुलाखतीत हर्षवर्धन पाटील म्हणत आहेत की “सगळीकडे काही दलबदलू नेते असतात, जे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलतात. निवडणूक तोंडावर आली की त्यांचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात. या लोकांना ते ज्या पक्षात आहेत किंवा ज्या पक्षात जातायत त्या पक्षाबद्दल प्रेम नसतं. त्यात केवळ त्यांचा स्वार्थ असतो. सगळीकडे असे आयाराम गयाराम असतात. निवडणूक आली की अशा आयाराम गयारामांची चलती असते. तेच लोक पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र जनता त्यांच्या या राजकारणाला मतदानातून योग्य उत्तर देते”. हा व्हिडीओ शेअर करत मिटकरी यांनी “आयाराम की गयाराम?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.