अजित पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि पक्षाचे दोन गट पडले आहेत. हे दोन गट आगामी लोकसभा निवडणुकीतही आमनेसामने येतील. लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (अजित पवार यांच्या पत्नी) असा नणंद भावजयीचा संघर्ष रंगणार आहे. अशात आता अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. काकांनी काहीही दिलं नाही असं म्हणणं चुकीचं आहे. आत्तापर्यंत अजित पवारांचं ऐकलं आता मात्र हा निर्णय पटलेला नाही असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे व्यवसाय आहेत. अजित पवार हे आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्त्वाचा निर्णय श्रीनिवास पवारांशी चर्चा करुन घेतात असं कायमच सांगितलं जातं. श्रीनिवास पवार हे राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते नेहमी दिसतात. आता प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट असते असं म्हणत त्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. अजित पवार जेव्हा नॉट रीचेबल असतात किंवा पक्ष आणि राजकारणापासून काही वेळासाठी दूर असतात तेव्हा ते श्रीनिवास पवारांच्या घरी असतात असं सांगितलं जातं. परंतु, त्याच श्रीनिवास पवारांनी आता अजित पवारांवर संताप व्यक्त केला आहे.

श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर यावर अजित पवार गटाने प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी श्रीनिवास पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मिटकरी म्हणाले, श्रीनिवास पवार आजपर्यंत कधीही राजकीय क्षेत्रात दिसले नाहीत. ते त्यांचे व्यवसाय सांभाळत होते. परंतु, आता त्यांनी राजकीय भाष्य केलं आहे. परंतु, अजित पवार यांनी याआधीच याची कल्पना देऊन ठेवली होती. अजित पवार म्हणाले होते की, कदाचित माझ्या कुटुंबातील माणसं माझ्याबरोबर नसतील. परंतु, बारामतीची जनता हाच माझा परिवार आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, श्रीनिवास पवार काल काटेवाडीत जे काही बोलले ती खरंतर जुनीच पद्धत आहे. घरातील माणसं एकमेकांविरोधात उभं करण्याची जुनी पद्धत आहे. दोन सख्ख्या भावांना एकमेकांविरोधात उभं करून त्यांना वाटत असेल की आपण निवडणूक जिंकू शकतो. परंतु, वरिष्ठ नेत्यांनी (शरद पवार) एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, हा तुमच्या भ्रमाचा भोपळा आहे, जो कधीही फुटू शकतो. केवळ श्रीनिवास पवार हे अजित पवारांचं कुटुंब नाही. संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ हे त्यांचं कुटुंब आहे.

अजित पवार हे आतल्या गाठीचे राजकारणी नाहीत. त्यांना डाव आणि कपट कळत नाही. काही लोकांना वाटत असेल की अजित पवारांना घेरणं सोपं आहे. परंतु, अभिमन्यूला चक्रव्युहात अडकवण्याचा काळ गेला. हा अभिमन्यू चक्रव्यूह भेदून कुरुक्षेत्राचं रणांगण मारून नेईल आणि तुम्हाला थांगपत्ता लागणार नाही.

हे ही वाचा >> “अजित पवारांवर आत्ताच भाजपाचा प्रचंड दबाव, विधानसभेला तर…”, रोहित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “नुकसानाच्या भितीने अनेक आमदार…”

श्रीनिवास पवार काय म्हणाले होते?

अजित पवारांचे मोठे भाऊ श्रीनिवास पवार म्हणाले होते, “तुम्हाला आश्चर्य वाटले की मी दादांच्या विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी उडी मारली. दादांची आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितलं की तू आमदारकीला आहे तर खासदारकी साहेबांना (शरद पवार) दिली पाहिजे. कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून आई वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? यांना जी काही पदं मिळाली ती शरद पवारांमुळेच. आता त्यांना म्हणायचं घरी बसा, किर्तन करा हे काही मला पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. आपण औषध विकत घेतो त्याला एक्स्पायरी डेट असते, तशीच नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते. आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचं नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari slams sharad pawar over ajit and shrinivas pawar rift asc
Show comments