रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा मंगळवारी विधान भवनावर धडकणार होती. मात्र पोलिसांनी ती वाटेत अडवली. त्यानंतर रोहित पवार यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं. हा सगळा प्रकार फ्लॉप झालेली युवा संघर्ष यात्रा चर्चेत आणण्यासाठी झाला असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसंच आम्हाला कुणीही शाहू, फुले आंबेडकर शिकवण्याची गरज नाही असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
“आपला शो फ्लॉप झाला आणि तो चर्चेत राहावा यासाठी रोहित पवारांनी प्रयत्न केला. आम्हीही पोलिसांकडून माहिती घेतली. तीन ते चार हजार लोक होते त्यावर लोक नव्हते. विविध संघटनेचे पदाधिकारी फोन करुन बोलवले गेले होते. फ्लॉप शो झाल्याने आमच्यावर लाठीचार्ज झाला हे सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन वगैरे दिलं असंही रोहित पवार म्हणाले. लाठी हल्ला केला हे सांगितलं तर हा जोक ऑफ द इयर आहे. “
शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार कुणीही शिकवू नये
“शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार आम्हाला शिकवण्याची गरज नाही. ते विचार आमच्या रक्तात आहेत. अजित पवारांनी निधी दिल्यानंतर तो निधी कसा चालतो रोहित पवारांना? स्वतःला शाहू, फुले आणि आंबेडकरांचे समर्थक ते समजत आहेत मग त्यांना हा निधी कसा चालतो? अजित पवार यांनीही फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार सोडलेला नाही.” असं मिटकरी म्हणाले.
अजित पवार म्हणतात ते योग्यच असतं
अजित पवार यांनी सहज बोलतो त्याप्रमाणे पीएचएडीबाबत वक्तव्य केलं. ते या पोरांनी इतकं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. रोहित पवार जर मला चटरपटर म्हणत असतील तर ठीक आहे, मी आहे. अजित पवार बोलतात तेच बरोबर असतं काही लोकांची कुवत नाही हे त्यांचं वाक्य मला आवडलं. मी एवढंच सांगेन की कुणीही अजित पवार होण्याचा प्रयत्न करु नये. असाही टोला मिटकरी यांनी लगावला.
रोहित पवारांकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते बाहेर आणावेत हे मी १ हजार टक्के खात्रीने सांगतो. रोहित पवारच नाही अनेकांनी धमक्या दिल्या आहेत. शेवटी शरद पवारांसह राहून इतकी खालची पातळी आपण गाठत असू तर तुम्हाला काय शरद पवार समजले? जेव्हा टीका पचत नाही तेव्हा अशा धमक्या दिल्या जातात असंही अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.