राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोर मिटकरी यांनी सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्यात केलेल्या भाषणामधील वक्तव्यांवरुन सध्या राष्ट्रवादी विरुद्ध अखिल ब्राह्मण महासंघ अशा नवीन वादाला पुण्यात तोंड फुटलं आहे. मिटकरींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यातील डेंगळे पुलाजवळ अखिल ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाजवळ जाऊन अखिल ब्राह्मण महासंघाकडून मंत्रघोष करण्यात येत होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र मिटकरी नेमकं काय म्हणाले होते ज्यावरुन एवढा वाद निर्माण झालाय जाणून घेऊयात.

नक्की वाचा >> “धरणात मुतायची मिजास केली म्हणून…”; अमोल मिटकरींचा पवार कुटुंबावर टीका करणारा जुना Video शेअर करत मनसे म्हणते, “थोर विचार…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगलीतल्या सभेत बोलताना मिटकरींनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला होता. “आपला बहुजन समाज कधी दुरुस्त होईल काय माहीत. आचमन करा…”, असं म्हणत मिटकरींनी मंचावर बसलेले मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेत पुढे बोलणं सुरु ठेवलं. “मुंडे साहेब एका ठिकाणी गेलो मी मुलीचा बाप म्हणाला बसा साहेब कन्यादान आहे. म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का हो? नाही म्हणे असतो ना… आम्हाला शिवकलंय असतो. बसा म्हणाले मी बसलो खुर्चीवर. बरं नवरदेव पीएचडी, नवरी एमए झालेली,” असं मिटकरी यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> “तुमचे दादा, साहेब आणि ताईंना कधीतरी…”; अमोल मिटकरींना मनसेचं खुलं आव्हान

यानंतर मिटकरी काही मंत्र म्हणाले. नंतर त्यांनी लग्न लावणारे ब्राह्मण (गुरुजी) सांगतात त्याप्रमाणे डोळ्याला पाणी लावा असं सांगितलं. नंतर ते गुरुजींच्या शैलीमध्येच, “तुमचा हात माझ्या हातात द्या,” असं म्हणाले. हे ऐकून मंचावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे हसू लागले. पुढे बोलताना मिटकरींनी, “आचमन करा, धुपम्, दिपम् नमस्कारम्…” असं म्हणत पुन्हा मंत्र म्हटले. मंत्र म्हणताना त्यांनी, “मम भार्या समर्पयामि” असं वाक्य म्हटलं. मिटकरींनी पुढे बोलताना, “मी नवरदेवाच्या कानात सांगितलं. म्हटलं अरे येड्या ते महाराज असं म्हणतायत.. मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामि म्हणजे घेऊन जा.” यानंतर सर्वच उपस्थित हसू लागले. “आरारा… कधी सुधरणार आपण. ही लोक आम्हाला हनुमान चालीसा सांगायला लागली,” असंही मिटकरी म्हणाले.

नक्की वाचा >> “…म्हणून राऊतांना राज ठाकरे ‘लवंडे’ म्हणतात”; ‘शरद पवाराला शरम वाटत नाही?’ म्हणणारा बाळासाहेबांचा Video शेअर करत मनसेचा टोला

मिटकरांनी माफी मागावी अशी मागणी…
दरम्यान, या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.

“कन्या हा काही दान करण्याचा विषय नाही”
“ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत, त्यांनी माझा व्हिडीओ पूर्णपणे तपासावा. मी कोणत्याही समाजाचं नाव घेतलेलं नाही. मी एका गावात कन्यादान सुरू असताना तिथे विरोध केला. कन्या हा काही दान करण्याचा विषय नाहीये. कन्यादान करत असताना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला, त्याचा अर्थ फक्त समजावून सांगितला. यांनी त्याला वेगळा जातीय किंवा राजकीय रंग देण्याचं काम करू नये. माझ्या विधानाचा विपर्यास करण्याचं काम विरोधकांकडून होतंय. माझा पूर्ण व्हिडीओ पाहावा. त्यात कोणत्याही समाजाबद्दल कोणताही अपशब्द वापरला गेलेला नाही”, असं मिटकरी म्हणाले आहेत.

“राज्यपाल सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलले तेव्हा…”
“मी संस्कृतचा जाणकार आहे. मला काही प्रश्न समजले नसतील, तर त्याचं मी उत्तर मागू शकतो. काही संघटना माफी मागा म्हणत आहेत. कशाची माफी मागायची? जे मला माफी मागा म्हणतायत, त्यांना माझा साधा प्रश्न आहे. आपल्या राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल जे बोलले, त्यावर तुम्ही काही बोलले नाही. मी राजकारणात नंतर आहे, माझा पिंड समाजकारणाचा आहे. राजमाता जिजाऊंची राजा शिवछत्रपतीमध्ये जी बदनामी केली गेली, यावर या लोकांनी माफी मागावी. त्यानंतर मी माफी मागायला तयार आहे”, असं मिटकरी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari vs brahmins issue what ncp mal said while talking about hindu rituals scsg
Show comments