लातूर : दहावी, बारावीच्या परीक्षेत गेल्या अनेक वर्षांपासून लातूरने आपली गुणवत्ता सिद्ध केली असून यावर्षी दहावीच्या परीक्षेत शंभर पैकी शंभर गुण घेणारे राज्यातील १५१ विद्यार्थ्यांपैकी लातूर विभागातून तब्बल १०८ विद्यार्थ्यांनी १०० गुण मिळविले आहेत.
कोकण विभागाचा राज्यात सर्वाधिक निकाल लागला मात्र शंभर पैकी शंभर गुण घेणारे कोकण विभागात केवळ तीन विद्यार्थी आहेत. पुणे विभागात पाच, औरंगाबाद विभागात २२, मुंबई विभागात सहा, अमरावती विभागात सात तर लातूर विभागात तब्बल १०८ विद्यार्थी आहेत.मराठवाडय़ात लातूर व औरंगाबाद हे दोन विभाग आहेत. या दोन विभागातच १५१ पैकी १३० विद्यार्थी १०० पैकी शंभर गुण मिळविणारे आहेत. लातूर जिल्ह्यातच गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक गुणवत्तेसाठी विविध परिश्रम घेतले जातात त्यात शाळा सुटल्यानंतर शाळेतच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यास वर्ग घेणे, नववीची परीक्षा लवकर संपून उन्हाळय़ाच्या सुट्टीतच दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे.
डिसेंबपर्यंतच संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून त्यानंतर सतत सराव परीक्षा घेणे. काही गुणवत्ताधारक शाळांमध्ये नेमके विद्यार्थी कुठे चुकतात, त्याचे कच्चे दुवे काय असतात, हे शोधून अन्य शाळांतील जे परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासतात अशा परीक्षकांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. सराव परीक्षा घेणे, रात्रीचे वर्ग घेणे यातून विद्यार्थ्यांला परीक्षेत यश कसे मिळवायला हवे आणि त्यासाठी अभ्यासाचा दृष्टिकोन कसा असायला हवा याचे मार्गदर्शन केले जाते. गेल्या तीन वर्षांपूर्वी शंभर पैकी शंभर गुण घेणारे सर्वाधिक विद्यार्थी लातूरच्या केशवराज विद्यालयाचे होते. त्यावेळी १४ विद्यार्थी होते. यावर्षी केशवराज विद्यालयाचे ११ विद्यार्थी, यशवंत विद्यालय अहमदपूरचे अठरा, देशी केंद्र विद्यालय लातूरचे नऊ, लालबहादूर शास्त्री विद्यालय उदगीरचे चार विद्यार्थी १०० पैकी शंभर गुण घेतलेले आहेत.