संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणूक पदवीधर नोंदणीला सुरुवात झाली आहे. या मतदार नोंदणीमधील त्रुटींच्या विरोधात ‘अभाविप’ने आज (२६ जुलै) कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांना घेराव घातला. या क्लिष्ट आणि त्रुटीयुक्त नोंदणी प्रक्रियेमुळे हजारो पदवीधर मतदार नोंदणीपासून वंचित राहणार असून पदवीधरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम अमरावती विद्यापीठ करीत असल्याचा आरोप अभाविपने केला.

प्रत्येक पदवीधराला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे –

विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितार्थ योजनांच्या अमंलबजावणीसाठी अधिसभा असते. त्यामुळे प्रत्येक पदवीधराला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, अशी मागणी करीत अभाविपने निवेदन दिले. मतदार नोंदणीची प्रक्रिया २० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात यावी, मोबाईल व्हेरीफिकेशन नसावे, ऑनलाईन फॉर्म भरत असताना विविध कागदपत्रे अपलोड करीत असताना स्वाक्षरी अपलोड करण्याचा पर्याय आवश्यक नसावा, २०२०-२१ सत्रामध्ये पदवीधर म्हणून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता डिग्रीचा आग्रह नसावा, गुणपत्रक मागवून त्यांना मतदार म्हणून नोंदणीकृत करण्यात यावे. या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

यावेळी अभाविपचे विदर्भ प्रांत मंत्री अखिलेश भारतीय, अमरावती महानगर सहमंत्री सावनी सामदेकर, अनुराग बालेकर, प्रीतेश ठाकूर, हर्ष बैस, हरी शालिग्राम, समर्थ रागीट यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader