एकीकडे राज्याच्या राजकारणात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा भाजपाला पूर्ण पाठिंबा देताना दिसत आहेत. मात्र, अमरावतीत भाजपा नेत्यांनी राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाचे नेते तुषार भारतीय यांनी मंगळवारी (२५ एप्रिल) रवी राणांवर बेवारस संपत्ती जमा केल्याचा आरोप केला आहे. तसेच वेळ आल्यास ईडी चौकशीचाही इशारा राणांना दिला. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

तुषार भारतीय म्हणाले, “रवी राणांनी बेवारस संपत्ती जमा केली आहे. आम्ही वेळ पडल्यास ईडी चौकशीची मागणीही करू. राणांनी काल विमानाने त्यांचा रिसॉर्ट किती मोठा आहे हे दाखवलं. वेळ आल्यास त्याच्या चौकशीचीही मागणी करू. त्यांनी वेळीच दुरुस्त व्हावं.”

नेमकं प्रकरण काय?

अमरावतीत भाजपा कार्यकर्त्यांनी रवी राणा आणि नवनीत राणांच्या बोर्डाला काळं फासलं. राणा बडनेरा मतदारसंघातील माजी नगरसेवकांनी मंजूर करून आणलेल्‍या विकास कामांचे श्रेय घेण्‍याचा प्रयत्‍न करत असल्याचा आरोप भाजपाने केला. या मुद्द्यावर माजी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजपाचे नेते तुषार भारतीय यांनी राणा राज्य-केंद्रात भाजपा नेत्यांच्या पाया पडतात आणि अमरावतीत भाजपा नेत्यांचं श्रेय घेतात, असा गंभीर आरोप केला.

व्हिडीओ पाहा :

“भाजपाकडून १० दिवसांपूर्वीच राणा दाम्पत्याला अल्टिमेटम”

तुषार भारतीय म्हणाले, “आमदार रवी राणांनी आमच्या नगरसेवकांनी मंजूर केलेल्या निधीच्या कामाच्या ठिकाणी स्वतःचे बोर्ड लावले. तसेच तो निधी आणि काम त्यांनी मंजूर केल्याचा दावा केला. म्हणून आम्ही त्यांना १० दिवसांपूर्वीच अल्टिमेटम दिला होता की, ते बोर्ड काढा, तुमचा त्याच्याशी संबंध नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फतही त्यांना निरोप दिला. मात्र, त्यानंतरही त्यांनी हा बोर्ड काढला नाही.”

“भाजपाचा कार्यकर्ता सहन करणार नाही”

“अशाप्रकारे रवी राणा काम करत नाहीत आणि दुसऱ्यांचं श्रेय घेत आहेत. हे प्रकार भाजपाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. म्हणून आज आम्ही त्याच्या बोर्डाला काळं फासलं. बडनेरे मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी असं कृत्य केलं असेल त्या त्या ठिकाणी भाजपाचा कार्यकर्ता त्याला काळं फासल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही हे कदापि सहन करणार नाही. भाजपा कार्यकर्त्याची पक्षनिष्ठा कमजोरी नाही, तर ही आमची ताकद आहे. हे आम्ही आगामी काळात त्याला दाखवून देऊ,” असा थेट इशारा तुषार भारतीय यांनी दिला.

हेही वाचा : VIDEO: “अजित पवार शरद पवारांनाच संभ्रमात ठेवतात”, भाजपा नेत्याचं मोठं विधान

“हा तिथे पाया पडतो आणि इथं भाजपा नेत्यांचं…”

तुषार भारतीय पुढे म्हणाले, “आम्ही राणांबाबतची तक्रार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आता आम्ही केंद्रात भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडेही तक्रार करणार आहोत. तसेच भाजपाचे संघटनमंत्री पी. एल. संतोष यांच्याकडेही तक्रार करणार आहे. हा तिथे पाया पडतो आणि इथं भाजपा नेत्यांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो.”

Story img Loader