विद्युत देयक न भरल्यामुळे महावितरणने मेळघाटातील कोयलारी ग्रामपंचायत पाणी पुरवठ्यासाठी वापरत असलेली वीज खंडित केली. कोयलारी व पाचडोंगरी गट ग्रामपंचायत असल्यामुळे दोन्ही गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा चार दिवसांपासून बंद झाला. त्यामुळे गावकऱ्यांनी गावालगतच्या विहिरीतून पाणी आणले व ते पिल्यामुळे जलजन्य आजाराने दोन्ही गावात थैमान घातल्याची बाब समोर आली आहे. दोन्ही गावातील सुमारे ५० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

कोयलारी गावातील रुग्णांमध्ये कॉलराची लक्षणे आढळून आली असून, रुग्णांना चुरणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे.

पाचडोंगरी येथे गुरुवारी अतिसारामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. पाचडोंगरीतील परिस्थिती आटोक्यात येण्यापूर्वीच पाचडोंगरीपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कोयलारी गावातही जलजन्य आजाराचा उद्रेक झाला. या दोन्ही गावात आता टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. मात्र तीन दिवस या गावकऱ्यांच्या पोटात दूषित पाणी गेल्यामुळे त्यांना कॉलरासदृश आजाराची लागण झाली आहे. तसेच कोयलारी येथील ४८ पैकी १८ जणांवर गावात तसेच काट कुंभ पीएचसीमध्ये उपचार सुरू असून गंभीर सहा जणांना चुर्णी येथे हलवले आहे. त्यापैकी दोघांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

सोमवारी मिळतील पाणी नमुन्याचे अहवाल –

गुरुवारी पाचडोंगरी तर शुक्रवारी कोयलारी येथील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. सोमवारी अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

Story img Loader