अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत पक्षीय स्पर्धा चार मोठय़ा पक्षांमध्ये दिसून येत असली, तरी भाजप आणि काँग्रेसमध्येच प्रत्यक्ष सत्तेसाठी झुंज होत आहे. कोणत्याही बडय़ा नेत्याविना काँग्रेसचे उमेदवार ताकद अजमावत असताना भाजपने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे.

निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात शिवसेना विरोधी पक्षापेक्षाही आक्रमक बनल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेदेखील अचंबित झाले आहेत.

महापालिकेत सर्वाधिक सत्ताकाळ गाजवण्याची कामगिरी ही काँग्रेसच्या नावावर असली, तरी राज्यात सत्तेवर असताना भाजपने स्थानिक पातळीवरही आपली पकड मजबूत केल्याचा इतिहास आहे. महापालिकेतही निभ्रेळ बहुमत मिळेल, असा आशावाद भाजपचे कार्यकर्ते बाळगून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अमरावतीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

राजकारणात उलथापालथ

गेल्या दशकभरात महापालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडून आली आहे. गेल्या निवडणुकीत स्थानिक आघाडय़ांनी आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले होते, त्याचा मोठा फटका काँग्रेसऐवजी भाजपला बसला होता. त्या वेळी भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वातील जनविकास काँग्रेस प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात होती. यावेळी जनविकास काँग्रेसचे अस्तित्व नाही. डॉ. देशमुख यांचा भाजपप्रवेश हा स्थानिक राजकारणाला मोठी कलाटणी देणारा ठरला. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र व माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्याकडे काँग्रेसची सूत्रे आली, पण यावेळी त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा संजय खोडके यांच्याकडे होती. ते आता काँग्रेसमध्ये आहेत. महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. ती कायम राखण्यासाठी काँग्रेसची धडपड दिसत असली, तरी ती केवळ प्रभावी काँग्रेस नगरसेवकांच्या भरवशावरच आहे.

शिवसेना विरोधी पक्षाच्या आवेशात मैदानात उतरलेली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला भाजपपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी यावेळी फारसे लक्ष दिलेले नाही. एकाही मोठय़ा नेत्याची सभा झालेली नाही. अशा स्थितीत आपले अस्तित्व टिकवण्याचे आव्हान स्थानिक नेत्यांसमोर आहे.

या निवडणुकीत बसपा आणि एमआयएम या दोन पक्षांच्या कामगिरीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अनेक प्रभागांमध्ये बसपाने ‘कॅडर’च्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजपची चिंता वाढवली आहे. स्पध्रेत काही ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा गवई गट आणि आठवले गटाचा अस्तित्वासाठी संघर्ष आहे. आघाडय़ांच्या राजकारणात या दोन्ही पक्षांची ताकद सीमित झाली आहे.

बडनेराचे आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष स्वबळावर मैदानात उतरला आहे. बहुतेक सर्वच पक्षांनी जातीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून व्यूहरचना केली आहे. भाजपमध्ये सर्वाधिक उमेदवार हे कुणबी आहेत. चार सदस्यीय प्रभाग प्रणालीतून सर्वाधिक लाभ पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र दक्षिण अमरावतीत पक्षाची ताकद नाही. मुस्लीमबहुल भागात तर भाजपने उमेदवारही दिलेले नाहीत. कोणत्याही स्थानिक मुद्दय़ांखेरीज होत असलेल्या या निवडणुकीत भाजपला वर्चस्व सिद्ध करण्याची संधी आहे.

Story img Loader