भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार अनिल बोडे यांनी दोन दिवसांपूर्वी एक आंतरधर्मीय विवाहाचं प्रकरण उघडकीस आणलं होतं. एका मुस्लीम तरुणाने हिंदू तरुणीशी बळजबरी विवाह केल्याचा आरोप त्यांनी केला होता. संबंधित प्रकरणाची पोलीस चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. याप्रकरणी आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. संबंधित विवाह बनावट कागदपत्रांच्या आधारे लावून दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती येथील चंद्रविला धर्मदाय संस्थेला लग्न लावून देण्याचा अधिकारी नाही. त्यांनी बनावट कागदपत्राचे आधारे हा आंतरधर्मीय विवाह लावून दिला आहे. संबंधित लग्नाच्या प्रमाणपत्रावर जी स्वाक्षरी होती, ती स्वाक्षरी मुस्लीम काझीची नसून एका मजुराची असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे.
याप्रकरणी चंद्रविला संस्थेविरुद्ध अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कलम ४६८ व ४१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी बनावट कागदपत्रे देऊन हा विवाह लावून दिला आहे. तर गेल्या १० वर्षांपासून या चंद्रविला संस्थेने बोगस कागदपत्रांच्याआधारे अनेक लव्ह जिहादसारखे प्रेम विवाह लावून दिले. अशा विवाहांसाठी चंद्रविला संस्थेला विदेशातून निधी मिळत असावा, असा आरोप भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे. चंद्रविला संस्थेची सर्व कागदपत्रांची कसून तपासणी केली जावी, अशी मागणी कुळकर्णी यांनी केली.
हेही वाचा- “रस्त्यावरील शेंबडं पोरगंही…” शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल!
पोलिसांनी मुस्लीम युवकाला संरक्षण दिलं- अनिल बोंडे
संबंधित प्रकरणावर भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बोंडे म्हणाले की, “पहिल्या दिवसांपासून हे लग्नाचं प्रमाणपत्र खोटं आहे, यावर मेहरची रक्कम लिहिली नाही, यावर काझीची सही नाही, असं मी म्हणत होतो. पण स्थानिक पोलिसांनी संबंधित प्रकरण कौटुंबीक असल्याचं सांगून मुस्लीम युवकाला संरक्षण देण्याचं काम केलं, ही दुर्दैवाची बाब आहे. आज अमरावतीच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून चंद्रविला धर्मदाय संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी बोंडे यांनी यावेळी केली.