चार दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन राडा घातला होता. एक हिंदू मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर नवनीत राणा यांनी एका मुस्लीम मुलावर लव्ह जिहादचे आरोप केले होते. संबंधित मुलाला तातडीने अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. एवढेच नव्हे तर नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली होती.
अखेर बेपत्ता झालेल्या मुलीने पोलीस ठाण्यात येऊन स्पष्टीकरण दिल्यानंतर नवनीत राणा तोंडघशी पडल्या आहेत. संबंधित मुलगी अभ्यासाच्या कारणातून एकटी घर सोडून निघून गेल्याचं समोर आलं आहे. आपली बदनामी थांबवावी, अशी विनंती संबंधित मुलीने केली. या सर्व घडामोडीनंतर लव्ह जिहादप्रकरणी आरोप करण्यात आलेल्या मुस्लीम मुलाच्या वडिलांनी नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. राणा दाम्पत्यापासून आमच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात नवनीत राणा तोंडघशी
यानंतर अखेर खासदार नवनीत राणा यांच्यावर अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. मुस्लीम मुलाचे वडील मलन्ग शाह यांनी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी कलम ५०० (बदनामी करणे) आणि कलम ५०६ (धमकी देणे) या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- VIDEO: नवनीत राणाविरोधात पोलीस पत्नी आक्रमक, एकेरी उल्लेख करत दिला इशारा, म्हणाल्या…
नवनीत राणा यांनी विनाकारण माझ्या मुलावर लव्ह जिहादचे आरोप करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात गंभीर स्वरुपाचे कलमे जोडावेत, अशी मागणी मुस्लीम मुलाच्या वडिलांनी केली आहे. राणा दाम्पत्याकडून आमच्या कुटुंबातील सदस्यांवर दबाब आणला जात असून आमच्या जीवाला धोका असल्याचे आरोप पीडित मुस्लीम मुलाच्या वडिलांनी केले आहेत.