शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संभाजी ब्रिगेड संघटनेशी युती केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड या नवीन सहकाऱ्याला घेऊन आपण खांद्याला खांदा लावून लढणार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे. एकनाथ शिंदे आमच्यापासून दूर गेले, हे चांगलं झालं, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडशी युती केल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी टीकास्र सोडलं आहे.
“उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, त्यांच्यात दम असता तर ते असं घरात बसले नसते” अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. एका जुन्या प्रकरणात सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्या मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होत्या.
हेही वाचा- गुलाम नबी आझाद स्वत:चा पक्ष करणार स्थापन, काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताच मोठी घोषणा
यावेळी उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी केलेल्या युतीबाबत विचारलं असता नवनीत राणा म्हणाल्या की, “मी आधीच तुम्हाला सांगू इच्छिते की, माझं उद्धव ठाकरे यांच्याशी कसल्याही प्रकारचं वैर नाही. उद्धव ठाकरे यांनाच नवनीत राणा, रवी राणा आणि हनुमानाची अडचण आहे. ही त्यांची अडचण असल्याने तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे.”
हेही वाचा- “नवनीत नाम सुनके…” नवनीत राणांची डायलॉगबाजी, पती रवी राणांवरही कौतुकाचा वर्षाव
नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, “गठबंधनं होत राहतील पण यशस्वी फक्त बाळासाहेब ठाकरे झाले. उद्धव ठाकरे राजकारणात यशस्वी होऊ नाही शकत. तुम्हाला काय वाटतंय… उद्धव ठाकरे यांची राजकीय कारकीर्द भविष्यात खूप चांगली असेल का? ते जसे आहेत, तसेच लोकं त्यांच्याकडे जातील. शिवसेनेत बंड करून जे आमदार बाहेर पडले आहेत. ते स्वत:च्या हिंमतीवर बाहेर पडले आहेत. त्यांनी काही ना काही नाव कमवलं आहे. संभाजी ब्रिगेडबाबत सर्वांच्या मनात आदर आहे. पण उद्धव ठाकरेंमध्ये दम नाहीये, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्यात दम असता तर घरी बसले नसते.”