बडनेरा ते नरखेड रेल्वे मार्गावर वलगावजवळ रेल्वे रुळ तुटल्याने प्रवासी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. एक मालगाडी या मार्गावरून गेल्यानंतर रेल्वे रूळ तुटून वेगळा झाला होता. त्यानंतर एका तरुणाच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली. त्याने लगेच रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली आणि रेल्वे रुळाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. यानंतर काही वेळाने दुरुस्तीचे काम पूर्ण झाले व रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली.

दरम्यान, दुरूस्ती काम होण्या अगोदर बडनेरा-नरखेड मेमू, काचीगुडा-नरखेड एक्स्प्रेस या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

अमरावतीपासून १० किलोमीटर अंतरावरील वलगाव येथील रेल्वे फाटकाजवळ ही घटना शनिवारी दुपारी घडली. या मार्गावरून चार प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. सोबतच मालगाड्यांचीही वाहतूक सुरू असते. शनिवारी दुपारी एक मालगाडी या मार्गावरून गेल्यानंतर रेल्वे रुळ तुटून वेगळा झाला होता. त्यानंतर अमरावती येथील रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून दुरूस्तीचे कार्य सुरू केले होते. दरम्यान, दुरुस्तीचे काम होईपर्यंत या मार्गावरील दोन रेल्वेगाड्या खोळंबल्याची माहिती समोर आली होती.

Story img Loader