अमरावती जिल्ह्यातील भाजपा आमदाराने भरवलेल्या कृषी परिषदेच्या मंचावर निवृत्त अधिकाऱ्याने केलेला डान्स हा चर्चेचा विषय ठरला आहे. कृषी परिषदेत नृत्याचे कार्यक्रम ठेवल्याने वाद निर्माण झाला असून याविरुन राष्ट्रवादी काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे भाजपा आमदाराने कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नृत्याचा कार्यक्रमही ठेवण्यात आला. यात एका निवृत्त नायब तहसीलदाराने मंचावर जाऊन ठेका धरला. या प्रकाराने आता वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरवरुन टीकेची झोड उठवली आहे. ही राष्ट्रीय कृषी परिषद की डान्सबार ?, भाजपाच्या आमदाराने शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली भरवलेल्या कृषिविकास परिषदेत चक्क नाच-गाण्यांचा कार्यक्रम घेतला. अमरावतीतील वरूड येथे हा प्रकार घडला. कृषी परिषदेच्या नावाखाली भाजपाने अश्लील नाचांचा कार्यक्रमच केला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

दरम्यान, वरूड येथे भाजपाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी ८ ते ११ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास परिषदेचे आयोजन केले होते. या दरम्यान, ९ फेब्रुवारीला लोककला दंडार कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. यात पुरुष कलाकार महिलांची वेशभूषा करुन नृत्य करतात. यात द्विअर्थी संवादाच्या माध्यमातून सामाजिक विषयावार भाष्य केले जाते. मात्र, या परिषदेत नृत्याचे कार्यक्रम का आयोजित करावे, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

Story img Loader