लोकसत्ता वार्ताहर
नांदेड : ‘अडीच वर्षांकरिता आले अन् जिल्हाधिकार्यांच्या बंगल्याचे नाव बदलून गेले’, ही आहे बदली होऊन गेलेले सनदी अधिकारी अभिजीत राऊत यांची ‘अमृतगाथा’. नांदेडमध्ये शासकीय अधिकार्यांसाठी असलेल्या बंगल्यांपैकी सर्वाधिक वलय अर्थातच जिल्हाधिकार्यांसाठी असलेल्या बंगल्याला प्राप्त झाले असून गेली चार दशके या बंगल्यात वास्तव्य केलेल्या अनेक माजी जिल्हाधिकार्यांनी जे केले नाही ते राऊत यांच्या कारकिर्दीत घडून गेले.
शहरातील शासकीय बंगले आणि निवासी इमारतींना पूर्वीच्या काळात विविध नक्षत्रे, झाडं -फुलं आणि धरणांची नावे देण्यात आली. पण जिल्हाधिकार्यांचा प्रशस्त आवारातील बंगला मात्र ‘स्नेह’ निवास या नावाने ओळखला जात होता. राऊत यांच्या वास्तव्यादरम्यान या बंगल्यावरील हे नाव अचानक पुसले गेले आणि त्या जागी ‘अमृतगाथा’ हे नाव झळकले!
सन २०२३-२४ दरम्यान मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असतानाच्या काळात जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानावरील नावामध्ये बदल झाल्याचे सांगण्यात आले. सर्व शासकीय बंगल्यांची देखभाल आणि नोंद सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दप्तरी असते. जिल्हाधिकार्यांच्या बंगल्याचे नामांतर अचानक कसे झाले, याबद्दल मात्र कोणतीही माहिती मिळू शकली नाही. महायुती सरकारने महाराष्ट्रातील काही शहरांची नामांतरे केली. पण एका सनदी अधिकार्याने नांदेडमध्ये बंगल्याचेच नाव बदलून टाकले.
नांदेडच्या एका माजी जिल्हाधिकार्यांच्या काळात वरील बंगल्यांची दुरूस्ती आणि नुतनीकरणाच्या कामावर ८० लाखांहून अधिक रक्कम खर्च करण्यात आल्यानंतर हे प्रकरण तेव्हा खूप गाजले होते. या प्रकरणी राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली तसेच उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने याचिकाकर्त्यास १ लाख रूपये अनामत भरण्यास सांगितले होते, पण ही मोठी रक्कम न्यायालयाने दिलेल्या मुदतीत जमा झाली नाही तर लोकायुक्तांकडील तक्रार प्रलंबित आहे.
नवे जिल्हाधिकारी रुजू
दरम्यान नूतन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी गुरुवारी सकाळी अभिजीत राऊत यांच्याकडून पदभार स्वीकारला. नूतन जिल्हाधिकार्यांच्या स्वागतासाठी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ.महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
राहुल कर्डिले हे २०१५च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असून येथे येण्यापूर्वी ते सिडकोत उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर होते. पूर्वी त्यांनी अमरावती, परभणी, चंद्रपूर आणि वर्धा इत्यादी ठिकाणी विविध पदांवर काम केले. राऊत यांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर येथे वस्तू व सेवाकर विभागात सहआयुक्त या पदावर झाली आहे. नांदेडमधील एकंदर कार्यकाळाबद्दल त्यांनी निरोप घेताना कृतज्ञता व्यक्त केली.