लोणावळा शहराप्रमाणेच महाराष्ट्रातही ज्या शाळेचा लौकिक आहे अशा गुरुकुल विद्यालयाचा अमृत महोत्सव साजरा होतो आहे. मुंबईतल्या प्रार्थना समाजाच्या सुधारणावादी वातावरणात वाढलेल्या गुरुवर्य ग. ल. चंदावरकर यांची विचारसणी आधुनिक होती. तरीही त्यांना प्राचीन संस्कृतीबाबत आदर होता आणि श्रद्धाही होती. प्राचीन शिक्षण पद्धतीवर आधारीत ऋषी-महर्षींच्या आश्रम शिक्षण संस्थेसारखी एखादी शिक्षणसंस्था असावी या उद्देशाने ग.ल. चंदावरकर आणि त्यांच्या पत्नी वसुंधरा चंदावरकर यांनी ७५ वर्षांपूर्वी ६ मार्च १९४९ या दिवशी पाच विद्यार्थ्यांसह ‘गुरुकुल’ या वसतिगृहयुक्ता शिक्षणसंस्थेची सुरुवात केली. शहरी वातावरणापासून दूर पण राज्यातील पालकांच्या दृष्टीने सोयीच्या अशा लोणावळ्यातील निसर्गरम्य वातावरणात गुरुकुलची सुरुवात झाली. चंदावरकर दाम्पत्याने त्यांचा त्याग आणि कष्ट यातून गुरुकुल नावाचे रोपटे लावले ज्याचा आज वटवृक्ष झाला आहे.
ग. ल. चंदावरकर यांनी शिक्षण क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून न पाहता शिक्षण हेच आपले जीवन असे मानले. त्यासाठी गुरुकुलाचं पालकत्व एकाच व्यक्तीच्या हाती असण्यापेक्षा तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग त्यात असावा याच हेतून विद्या विनय सभा या ट्रस्टची स्थापन करुन याकडे गुरुकुलचा कार्यभाग सोपवला.
बाबासाहेब डहाणूकर म्हणजेच चंदावरकर यांचे स्नेही यांनी या संस्थेला आपल्या मालकीच्या जमिनीपैकी तुंगार्ली लोणावळा येथील सहा एकर जागा दिली. तसंच ५१ हजार १११ रुपये देणगीही दिली. आज याच जमिनीवर गुरुकुलाच्या वसतिगृह आणि शाळेच्या इमारती डौलाने उभ्या आहेत. या वास्तू उभारण्यासाठी चंदावरकर दाम्पत्याच्या मदतीला मित्रपरिवारासह अनेक हात पुढे आहे. या वास्तूचा शीलान्यास तत्कालीन केंद्रीय वाहतूक मंत्री स.का. पाटील यांच्या उपस्थितीत महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या हस्ते पार पडला. या परिसराचं नामकरणच श्रीमंत बाबासाहेब डहाणूकर विद्यानगर असं देण्यात आलं आहे. त्यांनी दिलेल्या जमिनीसाठी आणि देणगीसाठी अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.
या संस्थेचे अध्यक्षपद श्रीमंत बाबासाहेब डहाणूकर, वि. द .मुझूमदार, प्रा अनंत काणेकर, डॉ. ग. ग. रणजीत, ग .ल. चंदावरकर, वसुधंराबाई चंदावरकर,य.ना . बेडेकर, डॉ. अनंत सोमण , दीपक गंगोळी यांनी भूषविले. सध्या दिनेश राणावत हे अध्यक्ष आहेत.अध्यक्षपद मिळेपर्यन्त सुरुवातिपासून ग.ल. चन्दावरकर हेच जनरल सेक्रेटरी होते. त्यानंतर गुरुकुलचे पहिले विद्यार्थी दीपक गंगोळी यांचेकडे जनरल सेक्रेटरी पद सोपविण्यात आले. आज ते उपाध्यक्ष असून सुरेश पनसरी यांची कार्यवाह म्हणून निवड झाली आहे.
नेहमीच्या शिक्षणाबरोबरच इतर शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रामुख्याने पर्यवेक्षित अभ्यास योजना, ज्ञानसाधना,व्याख्याने , संगणक प्रशिक्षण, इंग्रजी संभाषण , एन .सी .सी (नेव्हल्), स्काऊट, वार्ताफलक लेखन, सामान्यज्ञान , शालेय बचत बँक, क्रीडा , नाट्य, गायन , निबंध, चित्रकला, हस्तकला स्पर्धा , योगा, पर्यावरण ,वृक्षारोपण , निसर्ग निरिक्षण , वाचन, कथाकथन, श्रमदान, समाजसेवा इत्यादी अनेक उपक्रमांचा समावेश आहे त्याची दखल शासनानेही घेतली आहे.अशा विविध उपक्रमाद्वारे मुलांचा सर्वांगीण विकास आणि व्यक्तिमत्व संपन्न करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो.प्राचीन संस्कृतीचा वारसा समजावून सांगणे, सामाजिक विषमता, अंधश्रद्धा रुढींचे प्राबल्य, अज्ञान इत्यादि नष्ट करून सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यालयाची दिनचर्या अत्यंत शिस्तबद्ध आणि नियमित असल्यामुळे मुलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होताना दिसतो. स्पर्धेच्या युगात आपले विद्यार्थी मागे राहू नयेत म्हणून त्यांच्या सर्वांगीण प्रगतिकडे लक्ष दिले जाते. विद्यार्थ्याबरोबरच शिक्षकांदेखील विविध प्रशिक्षणाद्वारे अद्ययावत केले जाते. गुरुवर्य दीपक गंगोळी आजही वयाच्या ८४ व्या वर्षातहि संस्थेचे व्यवस्थापान सांभाळतात एवढेच नव्हे तर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी तसेच अध्यापन अधिक प्रभावी होण्यासाठी शैक्षणिक शिबिरे, व्याख्याने, चर्चासत्रे,व्याकरण प्रशिक्षण घेताना दिसतात.
गुरुकुलचे अनेक विद्यार्थी भारतात आणि भारताबाहेर विविध क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत, काही निवृत्त झाले आहेत, तर काही व्यवसायतही यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत.काही विद्यार्थी शालांत परीक्षेतील गुणवत्ता यादीतही चमकले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला आणि शिक्षकांच्या प्रयत्नांना राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर पुरस्काराने गौरविण्यात आले.त्यात गुरुवर्य खंडेराव राऊत आणि दीपक गंगोळी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर इतर शिक्षकांनाही तालुका आणि जिल्हा स्तरावर गौरविण्यात आले आहे. त्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून गौरव झाला असून ISO नामांकनही प्राप्त झाले आहे. प्रजासत्त्ताकदिनी दिल्ली येथे NCC(Navel) संचालनालयाचे नेतृत्व करण्याचा मानही या विद्यालयातील काही विद्यार्थ्यांना मिळाला आहे.