भाजपाच्या अनेक नेत्यांचा ड्रग्ज क्षेत्रातील लोकांशी संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही नवाब मलिक यांनी केलाय. मात्र पत्रकार परिषदेआधी मलिक यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला होता.
याच फोटोबद्दल खुलासा करताना फोटोमधील व्यक्ती जयदीप राणा असून अमृता फडणवीस यांनी गायलेल्या मुंबईमधील नद्यांच्या संवर्धनासंदर्भातील गाण्याचा तो फायनान्स हेड होता असा दावा मलिक यांनी केलाय. तसेच या गाण्याचा कथित ड्रग्ज पेडलर जयदीप राणाशी काय संबंध आहे याबद्दलही नवाब मलिक यांनी माहिती दलीय.
जयदीप राणाचा फोटो मी ट्विटरवर पोस्ट केलाय. वर्मा नावाच्या व्यक्तीने सर्व माहिती दिलीय. आम्ही देशाला सांगू इच्छितो की जयदीप राणा तुरुंगामध्ये आहे. एका सुनावणीमध्ये त्याला कोर्टात हजर करण्यात आलं नाही एनसीबी दिल्लीने तो साबरमती जेलमध्ये आहे असं सांगितल्याचं समजतंय, असं मलिक यांनी सध्या राणा कुठे आहे याबद्दल बोलताना सांगितलं.
देवेंद्र फडणवीसांसोबत जयदीप राणाचं खास कनेक्शन असल्याचा दावा मलिक यांनी केलाय. फडणवीस महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते तेव्हा मुंबई नदी संरक्षणासाठी एक रिव्हर साँग तयार केलं होतं. सोनू निगम आणि अमृता यांनी ते गाणं गायलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार यांनीही अभियन केला होता, असं सांगत मलिक यांनी गाण्याचा आणि राणाचा काय संबंध आहे याबद्दल भाष्य केलं आहे.
अमृता फडणवीस गाणं गातात हे चांगलं आहे. नदीबद्दल गाणं आहे हे ही चांगलं आहे. सोनू निगमला त्यात घेतलं हे ही चांगलं केलं. मुनगंटीवार यांनी अभिनय केला हे सुद्धा चांगलं झालं. गाणं अभिजित जोशींनी लिहिलेलं आहे. मात्र गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
आम्हाला कधी भेटले आम्हाला माहिती नाही असा पुन्हा बचाव करतील. मात्र देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणा घनिष्ठ संबंध आहेत. त्यांचे गणपतीच्या वेळेचे फोटो माझ्याकडे आहे, असं मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. नंतर त्यांनी तो फोटोही पोस्ट केलाय.
हे प्रकरण फक्त राणा आणि फडणवीस यांच्या संबंधांबद्दल नाहीय. तर हे प्रकरण महाराष्ट्रातील ड्रग्जच्या उद्योगांचं आहे, असं नवाब मलिक म्हणालेत. निरज गुंडेंच्या माध्यमातून फडणवीस हे ड्रग्जच्या उद्योगात सहभागी होते असा आरोप मलिक यांनी केलाय. फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा गुंडेला मुख्यमंत्री निवास, कार्यालयामध्ये, अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश होता. तो पोलिसांचे ट्रान्सफर ठरवायचा, असा दावा मलिक यांनी केलाय.
निरज गुंडेंच्या घरी फडणवीस अनेकदा जायचे. देवेंद्र फडणवीस यांचं मायाजाल तिथूनच चालायचं. सरकार बदलल्यानंतर केंद्रीय संस्था ज्यामध्ये ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स, एनसीबीचा महाराष्ट्रातील वावर वाढला. सगळ्या कार्यालयांमध्ये फडणवीसांचा प्रभाव दिसतोय, असंही मलिक म्हणालेत.
तसेच पोलिसांच्या बदलीसाठी कोट्यावधी रुपये घेतले गेल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. फडणवीसांनी वानखेडेंची बदली केलीय. ड्रग्जचा खेळ मुंबई गोव्यात सुरु राहावा असा हेतू आहेप्रतिक गाबा, काशिफ खान यांना सोडून देण्यात आलं. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रग्जचा खेळ चाललाय, असं नवाब मलिक म्हणाले.