उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावल्याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने अनिक्षा जयसिंघांनीला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निर्णय दिला. अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याकडे १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.तसंच हा संपूर्ण कट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी आखण्यात आल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.
चौकशीसाठी अनिक्षाला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणीही पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने मात्र अनिक्षाला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी फौजदारी कट रचण्याच्या आरोपासह भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यातील कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलबार हिल पोलीस ठाण्यात अमृता फडणवीस यांनी २० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर २०२१ मध्ये पहिल्यांदा भेट झाली होती.
कोण आहे अनिक्षा?
अनिक्षा जयसिंघानी ही सट्टेबाज अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अनिलल जयसिंघानीवर महाराष्ट्र, गोवा आणि आसामच्या सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देणं, फसवणूक करणं असे गुन्हे नोंद आहेत. अनिक्षाने कायद्याच्या विषयात पदवी घेतली. स्वतःला डिझायनर म्हणवणारी अनिक्षा १६ महिने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आहे. अनिक्षा जयसिंघानी ही पेशाने फॅशन डिझायनर आहे. ती कपडे, ज्वेलरी, शूज हे डिझाईन करते. २०२१ मध्ये अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ती भेटली होती. तिने फॅशन विश्वातल्या विविध गोष्टी सांगितल्या आणि अमृता फडणवीस यांचा विश्वास संपादन केला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अमृता फडणवीस यांनी अनिक्षाच्या विरोधात जो FIR केला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की अनिक्षाशी पहिली भेट २०२१ मध्ये झाली होती. अमृता फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की अनिक्षाने त्यांना हे सांगितलं होतं की ती डिझायनर आहे. अनिक्षाने अमृता फडणवीस यांना हे सांगितलं की पब्लिक इव्हेंटमध्ये तुम्ही मी डिझाइन केलेले ड्रेसेस आणि ज्वेलरी परिधान करा. त्यामुळे मला माझ्या ब्रांडचं प्रमोशन करता येईल. अमृता फडणवीस यांनी ही बाब मान्य केली. मात्र अमृता फडणवीस यांनी हा आरोप केला आहे की काही कालावधीनंतर अनिक्षाने तिच्या वडिलांच्या साथीने मला धमकी दिली आणि माझ्याविरोधात षडयंत्र रचलं. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांच्या विरोधात IPC च्या कलम १२० बी नुसार आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमृता फडणवीस यांनी हा एफआयआर मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारीला दाखल केली होती.