शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळून राज्यात नवं शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, या मंत्रिमंडळात एकही महिला नसल्यावरून जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी मुंबईत एका कार्यक्रमात आलेल्या अमृता फडणवीसांना पत्रकारांनी याबाबत विचारणा केली. यावर प्रतिक्रिया देत अमृता फडणवीसांनी महिलांनीही पुरुषांइतकी मेहनत करून या संधी घेतल्या पाहिजेत, असं मत व्यक्त केलं.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “पुढील मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना संधी दिली पाहिजे. महिलांनीही पुरुषांइतकी मेहनत घेऊन या संधी घेतल्या पाहिजेत. महिलांनी संधीची ‘डिमांड करण्यापेक्षा कमांड’ करणं आवश्यक आहे. राजकारणातच का प्रत्येक क्षेत्रात महिलांना संधी मिळाली पाहिजे. मात्र, ते स्थान महिलांनी ‘कमांड’ केलेलं असावं, ‘डिमांड’ केलेलं नको. पुरुषांइतकी किंवा त्यापेक्षा जास्त मेहनत करून महिला त्या स्थानावर बसतील तेव्हा त्यांना वेगळाच आदर असतो.”

“घराणेशाहीला संपवल्याचं ज्वलंत उदाहरण महाराष्ट्र”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही संपवली पाहिजे असं मत व्यक्त केलं. त्या वक्तव्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “घराणेशाहीला संपवल्याचं ज्वलंत उदाहरण महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचं मोठं उदाहरण आहेत. त्यांनी घराणेशाही संपवण्यासाठी महाराष्ट्रातून एक पाऊल पुढे टाकलं आहे.”

‘मी सामना वाचत नाही’, अमृता फडणवीसांचा खोचक टोला

सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावर झालेल्या टीकेवर उत्तर देताना ‘मी सामना वाचत नाही’, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा : ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ गाण्यावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या अमृता फडणवीसांना किशोरी पेडणेकरांचं गाण्यातूनच प्रत्युत्तर, म्हणाल्या…

किशोरी पेडणेकरांनी मोदी सरकारला केंद्रात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची मागणी केली. त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, “आपल्याकडे अनेक प्रकारची आरक्षणं आहेत. माझी इच्छा आहे माझ्या प्रतिनिधीने मेहनतीने पुढे यावं आणि ती जागा पटकवावी. त्यात जो आदर महिलांना मिळेल तो कशातच मिळणार नाही.”

Story img Loader