राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. त्यांच्या ट्विटर, इन्स्टाग्राम पोस्टवर मोठ्या प्रमाणावर लाईक, कमेंट्सचा पाऊस पडत असतो. त्यामुळे त्यांना फॉलो करणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे अमृता फडणवीसांची सामाजिक जीवनातली कोणतीही कृती ही चर्चेचा विषय ठरते. सध्या अशीच त्यांनी देवेंद्र फडणवीसांसाठी घेतलेल्या एका उखाण्याची चर्चा पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीसांनी हा उखाणा घेतला आहे.
भेटीगाठींवर अमृता फडणवीस म्हणतात…
अमृता फडणवीसांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर यावेळी भाष्य केलं. शरद पवार व अजित पवारांच्या गुप्त भेटीविषयी त्यांना विचारणा केली असता त्यांनी सूचक विधान केलं. “एवढ्यात मला कल्पना नाही की गुपचूप कोण भेटतंय. पण भेटणं कधीही चांगलं. तुम्ही गुपचूप भेटा किंवा सर्वांसमोर भेटा. प्रेमाने भेटा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि भेटत राहा”, असं त्या म्हणाल्या.
भारती लव्हेकरांच्या कार्यक्रमाला उपस्थिती
शनिवारी संध्याकाळी जोगेश्वरी पश्चिमच्या ग्रँड एफएम बँक्वेटमध्ये वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्याकडून श्रावण महिन्यानिमित्ताने मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर टीव्ही ९ शी बोलताना अमृता फडणवीसांनी मंगळागौर कार्यक्रम व त्यानिमित्ताने घेतलेला उखाणा ऑन कॅमेरा म्हणून दाखवला.
“मंगळागौर आपली प्रथा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आपण साजरी करतोय. स्त्रियांसाठी शारिरीकदृष्ट्या व मानसिक दृष्ट्या मंगळागौर महत्त्वाची आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये स्त्रीशक्ती आहे. काही स्त्रिया ती दाखवतात, काही नाही दाखवत”, असं अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.
अमृता फडणवीस यांचा उखाणा!
दरम्यान, मंगळागौर कार्यक्रमात त्यांनी घेतलेला उखाणा यावेळी पुन्हा म्हणून दाखवला.
मी फिरते तळ्यात,
नजर माझी मळ्यात,
देवेंद्रसारखे रत्न,
पडले माझ्या गळ्यात!!!
हल्लीच अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर काही रुद्राभिषेकाचे फोटो ट्वीट केले होते.
यात त्या स्वत: शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना दिसत आहेत.