शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी मुंबईत ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांचे मेळावे झाले. दोन्ही मेळाव्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. यावेळी ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी महायुतीच्या तिन्ही पक्षांवर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करताना त्यांनी “मी पुन्हा येईन” या वक्तव्याची पुन्हा खोचक शब्दांत आठवण करून दिली. याबाबत विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सूचक शब्दांत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीसांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. “जनतेच्या न्यायालयात आम्ही आमची लढाई जिंकलो आहोत. मात्र आता आम्हाला हेच वाटतंय की हे सरकार पडलंच पाहिजे. हे आपल्यावर आरोप करायचे की ‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही नैसर्गिक युती नाही’. पण म्हणजे काय? हे सांगाल का देवेंद्र फडणवीस? तुम्ही जे त्रांगडं करुन ठेवलंय त्याचं काय? मला नागपूरच्या अधिवेशनात तुम्ही म्हणाला होतात की ‘काट्याच्या अळीवर वसली तीन गावे, एकही वसेचि ना’. आता ते काढून ऐका तुमचं तुम्हीच”, असं उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले.
“आता ते कुठलं गाणं म्हणतायत माहितीये का?”
दरम्यान, ‘मी पुन्हा येईन’ या विधानावरून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. “पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणत आहेत जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना बारा. आता वाजवले की बारा तुमचे. बारा वाजवले आहेत तरीही सत्यानास करायचा आहे तुम्हाला. कुणाचीही महाराष्ट्राशी नाळ जोडलेली नाही, असं हे सरकार चाललं आहे. आता लढाई लढायची आहे. आता आपल्याला थांबता येणार नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना मेळाव्याच्या भाषणात लक्ष्य केलं.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीसांनी उपस्थिती लावली असता त्यांना उद्धव ठाकरेंच्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावरून त्यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “टीका करणारे करत राहतात. आपण आपलं काम करत राहायचं. आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्म केलं तर सगळ्यांचंच चांगलं होतं”, असं अमृता फडणवीस टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या.
“आज योगदिन आहे. हा एक सुंदर दिवस आहे. मी सत्ताधारी किंवा विरोधकांनाही हीच प्रार्थना करेन की प्रत्येकानं योग आणि ध्यान करावं. त्यामुळे सगळ्यांना सदबुद्धी येईल”, असंही अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.