राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. मुंबईत ३ टक्के घटस्फोट हे ट्रॅफिकच्या समस्येमुळे होत असल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर त्यावर शिवसेनेकडून खोचक प्रतिक्रिया देखील देण्यात आली होती. मात्र, आता या विधानासंदर्भात अमृता फडणवीस यांनी एबीपीशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, असं विधान करण्यामागचं कारण देखील त्यांनी दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ते’ विधान अहवालावर आधारित!

ट्रॅफिकच्या समस्येमुळे घटस्फोट होत असल्याचं विधान अहवालाच्या निष्कर्षांवर आधारित केल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. “मी जे सांगते ते अहवाल पाहून सांगते. ‘सर्वे मंकी’नं मुंबईमध्ये हा सर्वे केला होता. त्यात हे निष्कर्ष आले होते की घटस्फोटातल्या ३ टक्के प्रकरणांमध्ये वेळेत घरी पोहोचलो नाहीत, ट्रॅफिकमध्ये अडकलो, त्यामुळे घरी वेळ देऊ शकलो नाही अशी कारणं समोर आली. मी त्याचाच आधार घेऊन बोलले. हा सर्वे मंकीचा सर्वे आहे ज्यात याचिका देखील दाखल झाली होती. शिवाय नेदरलँडमधली टॉम टॉम ही एक कंपनी आहे. या कंपनीच्या सर्वेक्षणानुसार मुंबईत ४१ कोटींपेक्षा जास्त पैसा ट्रॅफिकमुळे वाया जात आहे. अशा रिपोर्ट्सपैकी एक मी सांगितला”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

“मी नागपूरची, मला ट्रॅफिकची सवय नव्हती”

“मी मुंबईच्या माणसाची स्थिती सांगितली आहे. मी नागपूरची आहे. मला ट्रॅफिकची एवढी सवय नव्हती. पण आता मी २-३ तास ट्रॅफिकमध्ये घालवते. मी जे काही बोलले ते सर्वे मंकी आणि टॉम टॉम कंपनीच्या सर्वेक्षणाच्या आधारावर बोलले”, असं देखील अमृता फडणवीस यांनी नमूद केलं.

“अमृता ताईंचा त्रास फार वेगळा आहे”, ३ टक्के घटस्फोट वाहतूक कोंडीमुळे होत असल्याच्या विधानावर शिवसेनेचा टोला!

“आमचे पती आम्हाला घरी दिसत नाहीत”

“भाजपाचं राज्य नसलं तरी सगळे भाजपाचे सदस्य बाहेर आहेत. कुणी घरी दिसत नाहीत. माझं आणि भाजपाच्या बायकांचं हेच रडगाणं आहे की आमचे पती आम्हाला घरी दिसत नाहीत”, असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

मुंबईत वाहतूक कोडींमुळे घटस्फोट होतात; अमृता फडणवीसांचा दावा

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

“मी एक सामन्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी बाहेर निघते तेव्हा मला किती वाहतूक कोंडी होते हे दिसतं, खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो हे दिसतं. मी एका सामान्य स्त्रीप्रमाणे बाहेर पडत असते,” असं सांगत अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “मुंबईत वाहतूक कोडींमुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण तीन टक्के आहे. कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis statement on divorce due to traffic in mumbai gave explanation pmw