Amruta Fadnavis on Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास ९० लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. सरकारने १७ तारखेच्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचा निधी एकत्रितरित्या मिळून तीन हजार रुपये द्यायला सुरुवात झाली आहे. या योजनेची राज्यभर चलती असताना विरोधकांकडून या योजनेवर टीका केली जातेय. या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर टीका केली जातेय. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना ही योजना का राबविली जातेय असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. तसंच, ही योजना फक्त पुढील दोन महिनेच सुरू राहणार असल्याचंही विरोधकांकडून सांगण्यात येतंय. यावर अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. श्रावण सरी आणि मंगळागौर या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे रक्षाबंधनाचं गिफ्ट आहे. हे पैसे महिलांच्या बचत खात्यात यायला लागले आहेत. त्यांची छोटी मोठी गरज असले, त्यांना यातून हातभार लागेल. हीच सरकारची इच्छा आहे. स्टंटमॅन लोकांनी हे नको सांगायला कोणी काय करतंय. हे लोकांसाठी काम करतंय. स्टंटमॅन लोकांनी नको सांगयला की हे स्टंट सुरू आहेत”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
उद्या लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही गरजू महिलांच्या घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आकाराला आली आहे. या योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (दि. १७) शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे. या कार्यक्रमास सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदींसह खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd