‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल महिला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना “तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आल्या असताना त्यांनी माध्यमांंशी संवाद साधला.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
“माझ्या मनात भिडे गुरुजींबद्दल आदर आहे. ते हिंदुत्त्वाचे स्तंभ आहेत. पण मला असं वाटतं, महिलांनी कसं जगावं हे कोणी सांगू नये, तिची एक जीवनशैली असते, त्याप्रकारे ती जीवन जगत असते”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.
नेमकं घडलं होतं?
संभाजी भिडेंनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना एका महिला पत्रकाराने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देण्याऐवजी त्यांनी “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही”, असे वादग्रस्त विधान केले होते.
हेही वाचा – रवी राणा-बच्चू कडू यांच्यात पुन्हा वाद? नवनीत राणा म्हणाल्या, “खासदार म्हणून एवढंच सांगेन…”
महिला आयोगाकडून भिंडेंना नोटीस
संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडूनही दखल घेण्यात आली. महिला आयोगाच्यावतीने नोटीस बजावत याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, याबाबत बोलताना राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर म्हणाल्या, “एक महिला पत्रकार शिक्षण घेऊन तिथेपर्यंत पोहचली आहे. टिकलीवरून महिलेची पात्रता आणि पद ठरवणे चुकीचं आहे. ही समाजाची विकृती आहे. सातत्याने महिलांना दुय्यम लेखणाऱ्यांची विकृती नाहीशी करायची आहे.”