खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले
तडफदार आणि लाडके उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी
येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा
सातबारा मध्ये..
पुढील रविवारी शिर्डी, सोलापूर

खासदारांची कामगिरी : पुण्याची बदनामी
‘पुणे तेथे काय उणे’ असे नेहमी बोलले जाते. राज्याची सास्ंकृतिक आणि शैक्षणिक राजधानी समजल्या जाणाऱ्या या नगरीच्या ‘राष्ट्रकुलदीपक’ खासदाराने मात्र पुणेकरांची मान शरमेने खाली घालायला लावली. सुरेश कलमाडी हे निवडून येत असले तरी तसा त्यांचा सर्वसामान्य पुणेकरांशी संबंध फारच कमी. निवडणुकीच्या काळात ‘हक्का’च्या मतदारांना खूश करायचे आणि निवडून यायचे याचे चांगले तंत्र कलमाडी यांनी अवगत केले. राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनातील भ्रष्टाचाराची चर्चा सुरू झाली आणि कलमाडी वादग्रस्त ठरले. कितीही फुशारक्या मारल्या तरीही सुरेशभाईंना तुरुंगाची हवा खावी लागली. काँग्रेसने त्यांना निलंबित केले. पुण्यातील काँग्रेस म्हणजे कलमाडी हे समीकरण हळूहळू कमी होत गेले. कलमाडी गटाचे खच्चीकरण करण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न झाले. पुण्यासाठी गेल्या साडेचार वर्षांंत कलमाडी यांनी कोणतेही मोठे काम केले नाही. या काळात त्यांची जास्त बदनामीच झाली. राष्ट्रवादीचे गल्लीतील नेते ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, अशी मागणी अधूनमधून करतात. आमदार मोहन जोशी यांच्यासह अनेक जण काँग्रेसमध्ये इच्छुक आहेत. पण प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांना लॉटरी लागू शकते. भाजपमध्येही घोळच आहे. यामुळेच पुण्याचा नवा कारभारी कोण होणार, याबाबत उत्सुकता आहे.
लोकसभा मतदारसंघ : पुणे</strong>
विद्यमान खासदार : सुरेश कलमाडी
(काँग्रेसमधून निलंबित)
मागील निकाल : भाजपचे अनिल शिरोळे यांचा पराभव
जनसंपर्क
कलमाडी यांचे जनसंपर्क कार्यालय म्हणजे ‘कलमाडी हाऊस.’ तेथूनच सर्व सूत्रे हलत असली, तरी सर्वसामान्य पुणेकर नागरिकांना या कार्यालयाचा कोणताही लाभ नाही.

मतदारसंघातील कामगिरी :
*नेहरू योजनेत केंद्राकडून पुण्याला अनुदान मिळण्यासाठी सातत्याने यशस्वी पाठपुरावा.
*नदीसुधार योजना, तसेच नवे जलशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर प्रयत्न.
*भामा आसखेड धरणातून पुण्याला पाणी आणण्याची योजना कलमाडी यांचीच. हा प्रकल्प केंद्राकडून मंजूर झाला आहे.
*महापालिकेच्या व अन्य शाळांमध्ये, शासकीय कार्यालयांमध्ये संगणकीकरणासाठी निधी उपलब्ध केला.
*महापालिकेच्या विकासकामांसाठी संरक्षण विभागाच्या जागा व परवानगी मिळवून देण्याचे यशस्वी प्रयत्न.

लोकसभेतील कामगिरी
*सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न : १४६ (तारांकित : १६,    अतारांकित : १३०)
*नियम ३७७ अंतर्गत
उपस्थित मुद्दे : ७
लोकसभेत मांडलेले महत्त्वाचे प्रश्न :
*पुण्यातील वनाझ-रामवाडी मेट्रो रेल्वे कॉरिडॉरसाठी केंद्र सरकारच्या वाटय़ाचा निधी उपलब्ध करण्याची मागणी
*पुण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेची शाखा आणि कमांडो पथक स्थापन करण्याची मागणी
*खंडित झालेल्या विमानसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत
*ससून डॉक फिशिंग हार्बरचे आधुनिकीकरण
*मुळा मुठा नदीचे प्रदूषण

एकूण हजेरी : १४४ दिवस (३१४ दिवसांपैकी)

मेट्रोला सर्वोच्च प्राधान्य
पुण्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मेट्रो सुरू व्हावी या कामाला माझे सर्वोच्च प्राधान्य आहे.  राज्याकडून पुणे मेट्रोचा प्रकल्प आता केंद्राकडे लवकर आला पाहिजे. नेहरू योजनेत देशातील सर्वाधिक निधी मी पुण्याला मिळवून दिला. त्याबद्दल लोकसभेत जयपाल रेड्डी यांनी माझे कौतुकही केले होते. पुण्यातील खड्डे, पाणीपुरवठा, वाहतूक याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. खासदार निधीतूनही शेकडो छोटी-मोठी कामे मी पूर्ण केली आहेत आणि माझा निधी आता जवळजवळ संपत आला आहे.
सुरेश कलमाडी

पुण्याची देशभरात बदनामी केली
निवडून गेल्यापासून कलमाडी यांनी पुण्यासाठी कोणतेही भरीव काम तर केले नाहीच, उलट त्यांच्या गैरव्यवहारांमुळे पुण्याची देशभरात बदनामी झाली. कलमाडींमुळेच बालेवाडीची दुर्दशा झाली आहे. गाजावाजा करून त्यांनी जी बीआरटी सुरू केली ती देखील अयशस्वी ठरली आहे. फेस्टिव्हल, देणग्या, दौरे, समारंभ, उधळपट्टी आणि लोकप्रिय घोषणा हाच त्यांचा विकासाचा कार्यक्रम पुणेकर पाहात आहेत.
अनिल शिरोळे