नांदेड: देगलूर येथील कृषी व्यावसायिकाने बँकेत भरण्यासाठी दिलेली २६ लाख रुपयांची रकम चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून लंपास केली असा बनाव करणा-या वाहनचालकाला व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण रकम जप्त केली आहे. 

गणेश वंचितवार यांचे गणेश कृषी विकास केंद्र नावाने देगलूर येथे दुकान असून मागील दोन दिवसात विक्री झालेल्या मालाची रकम त्यांनी त्यांच्या विश्वासू वाहनचालक कमलाकर नरभागे याच्याकडे देऊन बँकेत भरण्याकरिता कारमध्ये पाठविले होते. मात्र पाण्याच्या टाकीजवळ आल्यानंतर नरभागे याने वंचितवार यांना फोन करून दुचाकीवर आलेल्या दोघांनी मला चाकुचा धाक दाखवून रकम लुटून नेली असा बनाव केला. वंचितवार यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नरभागे यांनी सांगितल्याप्रमाणे घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच दुचाकीवर दोघे आले होते. मात्र त्यांनी वाहनातील रकम भरलेली बॅग सहज नेली होती. या प्रकारावरून पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नरभागे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.  या गुन्ह्यात आणखी दोघेजण असून त्यांची नावे देखील त्याने सांगितली होती. पोलिसांनी या दोघांनाही देगलूर -नायगाव रस्त्यावरून अटक करून गुन्हा नोंद केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An agricultural businessman from degalur stole rs 26 lakh which he paid to the bank amy
First published on: 24-06-2024 at 21:56 IST