मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण चालू असताना मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत सोमवारी (३० ऑक्टोबर) हिंसाचार उफाळला. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंखे यांच्या घरांची जाळपोळ झाली. त्यानंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. विविध ठिकाणी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोडही करण्यात आली असून दोन पोलीस जखमी झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी X वर त्यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे.
गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. परंतु, सरकार पातळीवर ठोस निर्णय घेतला जात नाही. काल (३० ऑक्टोबर) झालेल्या उपसमितीच्या बैठकीतही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर, दुसरीकडे मनोज जरांगेंनी उपोषण सोडावं या मागणीसाठी मराठा समाजाने आग्रही भूमिका मांडली. याचे पडसाद राज्यभर उमटले. तसंच, सत्ताधाऱ्यातील काही नेत्यांनी वादग्रस्त विधाने केल्याने अनेकठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त करत मराठा आंदोलनाची दिशा भरकटत असल्याचं म्हटलं आहे. तसंच, आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न असून जाणीवपूर्वक असे प्रकार घडवून आणले जात आहेत का याबाबत मराठा समाजाने सजग असायला हवं असंही म्हटलं. तसंच, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही असाच रोख व्यक्त केला आहे.
हेही वाचा >> बीडमध्ये उद्रेक, आंदोलकांकडून ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना; अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू
“राज्यात काही ठिकाणी अज्ञात व्यक्ती सार्वजनिक मालमत्ता, बसची जाळपोळ, तोडफोड करीत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माझे नागरीकांना नम्र आवाहन आहे की कृपया आपण सर्वांनी संयम ठेवावा व शांतता राखावी. आरक्षणाचे आंदोलन विधायक मार्गाने सुरू आहे. त्याला गालबोट लावण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत. माझे मनोज जरांगे पाटील यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी”, अशी पोस्ट सुप्रिया सुळेंनी केली आहे.
आंदोलकांचा रोख राजकारण्यांवर
यवतमाळमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या फलकांना डांबर फासण्यात आले. धाराशिव येथे पालकमंत्री तानाजी सावंत, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या छायाचित्रांना काळे फासण्यात आले. गंगापूर येथे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. जालना जिल्ह्यात राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
हेही वाचा >> “मराठा आंदोलनाची दिशा भरकटली”, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर जरांगे संतापले; म्हणाले, “आमच्या वाट्याला…”
सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी जरांगे ठाम
मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे-पाटील यांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगून आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.