अलिबाग : दुबईच्या धर्तीवर अलिबाग येथे भव्य मत्स्यालयाची उभारणी होणार असून, हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच मत्स्यालय प्रकल्प आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अलिबाग मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी हे मत्स्यालय आकर्षणाचे केंद्र ठरेल असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला. अलिबाग नगर परिषदेच्या विशेष अनुदान योजने अतंर्गत अलिबाग समुद्र किनारी भव्य मत्स्यालयाची उभारणी केली जाणार आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा भूमिपूजन पार पडला यावेळी ते बोलत होते.
या प्रकल्पासाठी राज्यशासनाने ६० कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहे. विवीध प्रकारचे सागरी मासे या मत्स्यालयात ठेवले जाणार आहेत. ४० फूट लांबीच्या मत्स्यालय टनेलचा यात समावेश असणार आहे. या शिवाय या मत्स्यालयात पर्यटकांना पाण्यात उतरून सागरी जीवसृष्टीचा अनुभव घेता येणार आहे. फूड कोर्ट आणि कॅफेटेरीयाचाही या समावेश असणार आहे. दुबईच्या धर्तीवर हे मत्स्यालय उभारण्यात येणार असून देशातील अशा पध्दतीचे हे पहीले मत्स्यालय असणार आहे. आठ महिन्यात मत्स्यालयाचे बांधकाम पूर्ण केले जाईल. त्यामुळे आगामी काळात अलिबाग मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी हे मत्स्यालय आकर्षणाचे केंद्र ठरेल असा विश्वास त्यानी व्यक्त केला. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या मैदानात या मत्स्यालयाची उभारणी केली जाणार आहे. कंटेनर पध्दतीच्या या अभिनव मत्स्यालयात बोगद्याच्या आतून सागरी माशांचे विश्व अनुभवता येणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हाधिकारी किशन जावळे आणि माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक मुख्याधिकारी सचिन बच्छाव, अलिबागचे माजी नगरसेवक तसेच नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.