कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र गतवर्षीची घटना लक्षात घेता यावेळी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अमरावती येथील हजार लोकवस्ती असणाऱ्या मुरशी काटपूर गावातील 15 महिला मागील गेल्या 20 वर्षांपासुन पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यास येत आहेत.

यंदा देखील या महिला कोरेगाव भीमा येथे आल्या असून त्यांच्यातील कुसुम रामकृष्ण इंगळे या आजींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘आम्ही गावातील पंधरा महिला दरवर्षी 1 जानेवारीला येथे अभिवादन करण्यास येत असतो. त्यापूर्वी आठवडाभर अगोदरच दादरची चैत्यभूमी, रायगडचा किल्ला, गोराईतील ग्लोबल विपश्यना पॅगोडा, महाडचं चवदार तळं, देहूरोडची धम्मभूमी त्यानंतर शेवटी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला भेट देण्यासाठी आम्ही येतो, 29,30,31 आणि 1 असे चार दिवस आम्ही मुक्काम करतो. दररोज विजयस्तंभाला अभिवादन करतो. यामुळे आम्हाला एक वेगळ समाधान मिळत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

त्या पुढे म्हणाल्या की, मागील वर्षी या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे सगळं सुन्न झाले. पण आम्ही यंदा देखील आलो आहोत आणि 1 तारखेपर्यंत आम्ही येथे थांबणार आहोत. आम्हाला काही भीती वाटत नाही. तुम्हीदेखील घाबरू नका. पोलिसानी चांगल्या प्रकारे व्यवस्था केली आहे. सर्वानी अभिवादन करण्यास यावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

Story img Loader