शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. तब्बल १५ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊतांना आज न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटत असून अनेक शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून ईडीच्या कारवाईविरोधात आंदोलन करत आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे.
यानंतर आता संजय राऊत अटकेप्रकरणी धर्मवीर आनंद दीघे यांचे पुतणे केदार दीघे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटलं की, “दडपशाहीचं राजकारण करून कधीही जिंकता येत नाही. संजय राऊतांना जरी अटक झाली असली तरी, त्यांचा तोरा असा होता, जसं काही त्यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांच्या अंगात जी रग आहे? जो विचार आहे? तो बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे. त्यामुळे अशाप्रकारे कितीही दडपशाही केली तरी शिवसैनिक कोणत्याही कार्यासाठी थांबत नाही. शिवसेना ही संघटना आजतागायत मोठी होती. यापुढे देखील मोठी होत राहील.”
“कोण केदार दीघे? मी त्यांना ओळखत नाही” या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाबाबत विचारलं असता, केदार दीघे म्हणाले की, “ते मला ओळखत नाहीत, याचं मला नवल वाटलं. पण असो. ते मला ओळखत नाहीत, असं जर त्यांचं विधान असेल तर ते चांगलं आहे. कारण येणाऱ्या काळात ते मला चांगलं ओळखतील, याची मला खात्री आहे.”
दरम्यान, राऊतांना अटक केल्याप्रकरणी शिवसेना पक्ष आक्रमक झाला आहे. राज्यसभा खासदार आणि शिवसेना प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभा अध्यक्षांना एक पत्र दिलं आहे. २०१४नंतर ईडीने केलेल्या कारवाया संशयास्पद असून त्यांची चौकशी झाली पाहिजे, तसेच ईडीच्या कारवायांबाबत संसदेत चर्चा करायला हवी, अशी मागणी चतुर्वेदी यांनी पत्राद्वारे केली आहे.