हर्षद कशाळकर, लोकसत्ता,
अलिबाग – कोकणात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर आनंद कुट्या उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. कोकणातील ८ किनाऱ्यांवर प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार होता. स्थानिकांनी ही कल्पना उचलून धरत शासन निर्णयाचे स्वागत केलं होते. मात्र तीन वर्षानंतरही हा कागदावरच राहीला आहे.
निळाशार समुद्र , रूपेरी वाळू , विस्तीर्ण किनारे , नारळी पोफळीच्या गर्द बागा यामुळे कोकण नेहमीच पर्यटकांनी बहरलेलं असतं . इथल्या निसर्ग सौंदर्याचा आणि ताज्या मासळीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं आपोआप कोकणाकडे वळतात . म्हणूनच अलीकडे कोकणातील अनेक समुद्र किनारयांना मिनीगोवा असं संबोधलं जातं परंतु आता गोव्याच्या धर्तीवर कोकणातील पर्यटन वाढीसाठी समुद्र किनाऱ्यांवर आनंद कुट्या( बीच शॅक्स ) प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीच शॅक्स पॉलीसीची घोषणा करण्यात आली होती.
हेही वाचा >>> तुळजाभवानीचा पुरातन दागदागिने चोरी प्रकरणी अखेर गुन्हा; चार महंत, धार्मिक व्यवस्थापक, सेवेकरी यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल
सुरूवातीला कोकणातील ४ जिल्हयातील ८ किनाऱ्यांवर हा पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार होता. यात रायगड जिल्हयातील वरसोली आणि दिवेआगर, रत्नागिरीतील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्गातील तारकर्ली, कुणकेश्वर, आणि पालघर जिल्ह्यातील केळवा आणि बोर्डी या समुद्रकिनाऱ्यांचा समावेश होता. शासनाच्या या भूमिकेचं स्थानिकांनी स्वागत केले होते. कारण पर्यटन विकासात येणार अनेक अडथळे यामुळे दूर होणार होते. पण ३ वर्ष सरली तरी याबाबत शासनस्तरावर हे प्रकल्प कागदपत्रातच अडकून राहिल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे राज्यसरकारने घेतलेल्या या निर्णयाचे कोकणवासियांनी जोरदार स्वागत केले होते. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळेल. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळेल अशी अपेक्षा रायगड मधील पर्यटन व्यवसायिकांनी व्यक्त केली होती. विकासाबरोबर जे अधिक उणे होईल ते स्वीकारण्याची तयारीही त्यांनी दाखवली होती. पण बीच शॅक्स पॉलिसी कागदावरच राहीली. त्यामुळे दिवेआगर आणि वरसोली येथील पर्यटन व्यवसायिकांचा हिरोमोड झाला आहे.
हेही वाचा >>> “मोदी सरकार लोकशाहीचा खून करतंय”, खासदार निलंबनावरून नाना पटोले यांची टीका, म्हणाले…
प्रकल्पासाठी मध्यंतरीच्या काळात पर्यटन विभागाने वरसोली येथे येऊन सर्वेक्षण केले होते. ग्रामपंचायतीकडून लागणारे सर्व सहकार्य देण्याचे आम्ही त्यांना कबूल केले. त्यासाठी लागणारे ठरावही आणि जागाही हस्तांतरीत केली होती. मात्र अजून तरी प्रकल्पाचे काम सुरु होऊ शकलेले नाही. हे काम लवकर सुरु व्हावे यासाठी आमचा पाठपुरावा सुरु आहे. – मिलींद कवळे , उपसरपंच वरसोली
पर्यटन विभागाने सिआरझेड मंजूरीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. नगर रचना विभागाकडून ते अंतिम मंजूरी साठी पाठवले जातील. येत्या दोन ते तीन महिन्यात त्यांना मंजूरी मिळेळ अशी अपेक्षा आहे. त्यानंतर प्रकल्पांचे काम प्रत्यक्ष सुरू होऊ शकेल. आकाश चकोर, कार्यकारी अभियंता, पर्यटन विकास महामंडळ