भाजपशी केंद्रात आणि राज्यात केलेली युती हा एक राजकीय समझोता आहे. सेना आणि भाजप हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांची कार्यप्रणाली आणि विचारसरणी वेगळी आहे. भाजप जर शतप्रतिशतचे स्वप्न पाहत असेल तर शिवसेनेने १०० टक्के सेना असा विचार करणे काय गर आह़े असे मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केले आहे. यापुढे जिल्ह्य़ात कुठल्याही पक्षासोबत सेना युती करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. ते अलिबाग भाग्यलक्ष्मी हॉल येथे आयोजित शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. या वेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख सुरेन म्हात्रे, सल्लागार किशोर जैन, जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ संघटक संदीप घरत, दिपक रानवडे आदी उपस्थित होते. शिवसेना हा राजकीय पक्ष नसून ती एक संघटना आहे. ती राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे राजकीय पक्षाप्रमाणे पक्षाला संघटनात्मक बांधणी करावी लागली आहे. मात्र आजही राजकारणापेक्षा समाजकारणाकडे सेनेचा भर आहे. त्यामुळे पक्षाची कार्यपद्धती जाणून यापुढील वाटचाल करायची असल्याचे गीते यांनी या वेळी सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जर शिवसेनेला चांगले मतदान होत असेल तर ग्रामपंचायत, नगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकीत पक्षाला का मते मिळत नाहीत. असा सवाल त्यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांना केला. यापुढे कुठल्याही पक्षाशी कुठल्याही स्तरावर निवडणुकीत युती करायची नाही, जिल्हा परिषद, नगर पालिका निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. त्यासाठी लागणारे बेरजेचे राजकारण करावे लागणार आहे. पक्षात येणाऱ्यांना सोबत घेऊन पुढची वाटचाल करायची असल्याचेही गीते यांनी स्पष्ट केले. जिल्ह्य़ात राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठय़ावर आहे. अनेक दिग्गज नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. शेकापमधूनही काही जण सेनेत दाखल होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात सेनेला टक्कर देणारा पक्ष जिल्ह्य़ात शिल्लक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्य़ातील सर्व नगरपालिका यापुढे शिवसेना स्वबळावर आणि संपूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांनी जाहीर केले. पक्षातील मतभेद, कुरबुरी आता बाजूला ठेवा, जुना-नवा वाद विसरून निवडणुकीच्या तयारीला लागा. असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. किशोर जैन, सुरेन म्हात्रे यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख दीपक रानवडे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा