एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी केली आणि राज्यात सत्तापालट झाला. या पार्श्वभूमीवर एकीकडे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरील राजकारणावर देखील याचा प्रभाव पडताना दिसत आहे. शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या कोकणात या राजकीय घडामोडींचे पडसाद उमटू लागले आहेत. बंडखोरी केलेल्या कोकणातील आमदारांना शिवसेनेकडून लक्ष्य केलं जात असून शिवसेना नेते अनंत गीते यांनी या बंडखोरीवरून परखड शब्दांत टीका केली आहे. रत्नागिरीत झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.
“उद्धव ठाकरेंनी प्रयत्न सोडून द्यावेत”
बंडखोरी करून गेलेले आमदार पुन्हा येणार नसून नव्याने शिवसेना उभी करू, असा निर्धार यावेळी अनंत गीतेंनी बोलून दाखवला. “वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेल्यांपैकी एकही आता परत येणार नाहीत. ते प्रयत्न उद्धव ठाकरेंनी करू नयेत. मी उद्धव ठाकरेंनाही सांगणार आहे. जे गेलेत, त्यांना मातीत गाडून टाकू आणि नव्याने शिवसेना उभी करू. बंडखोरांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे आणि साखळी भाजपाच्या हातात आहे. त्यातला एकही परत येणार नाही”, असं ते म्हणाले.
महाड-रत्नागिरीचं भूत?
दरम्यान, यावेळी बोलताना अनंत गीतेंनी महाड आणि रत्नागिरीच्या भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद शिवसेनेत असल्याचा टोला लगावला. त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? यावरून राजकीय चर्चा सुरू झाली असून तो योगेश कदम आणि उदय सामंत या दोन बंडखोर आमदारांच्या दिशेने असल्याचं बोललं जात आहे.
“मी अलिबागच्या सभेत सांगितलंय की महाडच्या भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद माझ्यात आहे. तुमच्या रत्नागिरीच्या भुतालाही बाटलीत बंद करण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. कुठल्याही भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद शिवसेनेत आहे. चिंता करण्याचं काही कारण नाही. रत्नागिरी असो किंवा दापोली असो”, असं गीते यावेळी म्हणाले.
मी नरेंद्र मोदींना इशारा दिलाय की त्यांनी… – अनंत गीते
रत्नागिरी जिल्ह्यातून आमदार योगेश कदम आणि उदय सामंत बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेच्या विरोधात बंड करूनसुद्धा आम्ही शिवसैनिकच आहोत असे दोघेही ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे या मेळाव्यात गीते यांनी दोन्ही बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. तसेच भाजपवरही सडकून टीका केली. ते म्हणाले की, नारायण राणे, छगन भुजबळ यांनी केलेले बंड वैयक्तिक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड भाजपप्रणित आहे. या बंडातून सामान्य जनतेला किंवा शिवसैनिकांना काहीही मिळणार नाही. सत्तेसाठी लाचार झालेले हे आमदार बंडात सहभागी झाले आहेत. जे गेलेत ते परत येणार नाहीत. या बंडखोरांच्या गळ्यात भाजपाने पट्टा बांधला आहे. त्याची साखळी भाजपच्या हातात आहे.