काँग्रेससाठी काका-पुतण्यांचं नातं धार्जिणं आहे, असं उपहासात्मक विधान जयंत पाटलांनी आज केलं. काँग्रेसमधील दिलीप देशमुख आणि अमित देशमुखांना उल्लेखून जयंत पाटलांनी हे विधान केलं. तसंच, राजकारणासाठी व्यक्तिगत नातं तोडू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर आज राज्यभर काका-पुतण्यांच्या नात्यांची चर्चा पाहायला मिळाली. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून अध्यक्ष राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नात्याविषयी खास पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आज महाराष्ट्रात राजकीय कुटुंबातील काका – पुतण्या या नात्यावर अनेक जण व्यक्त होत आहेत. कुणी आपल्या काकांचं वय काढतोय, उर्मट बोलतोय तर कुणी काकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना गहिवरतो आहे, अशी टीका मनसेच्या अधिकृत खात्यावरून करण्यात आली.

हेही वाचा >> “राजकारणासाठी व्यक्तिगत नाते तोडू नये”, काँग्रेसमधील ‘काका-पुतण्या’च्या नात्यावर जयंत पाटलांचं विधान!

“पण अशाच एका काका – पुतण्याचं निस्सीम प्रेम महाराष्ट्राने अनुभवलं आहे. ती दृश्य आजही महाराष्ट्राला स्तब्ध करतात. २०१२ साली बाळासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला जाणार होता आणि बराच काळ धीरगंभीर होऊन अंत्यसंस्कार पाहणाऱ्या राज ठाकरे यांचा बांध फुटला आणि बाळासाहेबांचा ‘राजा’ ढसाढसा रडला. आजही ते क्षण आठवले की, गहिवरुन येतं, हेच खरे मराठी संस्कार”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मनसेच्या अधिकृत खात्यावरून ही पोस्ट शेअर करताना दोन फोटोही पोस्ट करण्यात आले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारावेळचे हे फोटो असून यामध्ये राज ठाकरे भावूक झालेले स्पष्ट दिसत आहेत. परंतु, मनसेने काही वेळापूर्वी केलेली ही पोस्ट आता डिलिट केली आहे.

मनसेने डिलिट केलेली पोस्ट

जयंत पाटील काय म्हणाले होते?

“काँग्रेसचं बरं आहे काका-पुतण्याचं नातं धार्जिणं दिसत आहे. दिलीप देशमुख उत्तमपणाने नेतृत्त्व करत आहेत. अमित यांच्यासह सर्वांचे संबंध मधूर आहेत. राजकारणात कसंही कोणी वागलं तरी चालतं. पण राजकारणासाठी व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका कोणी घेता कामा नये. आता त्याही गोष्टी व्हायला लागल्या आहेत”, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: And balasahebs king cried a lot special post of mns on uncle nephew relationship sgk