भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आजपासून शिवशक्ती परिक्रमेला सुरुवात केली. वेरूळच्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिगांचे दर्शन घेऊन त्यांनी या परिक्रमेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधितही केलं. “माझ्या मेळाव्याला ना भजन आहे, ना भोजन आहे तरीही तुम्ही येता”, असं म्हणत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी त्यांनी राजकारणात कसा प्रवेश याबाबतही माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी दसरा मेळावा घेते. हा दसरा मेळावा घेत असताना मागच्या वेळी मी लोकांचे हात जोडून माफी मागितली होती. माझ्या मेळाव्याला ना भजन आहे, ना भोजन आहे, तरीही तुम्ही येता. बसायलाही जागा होत नाही. खुर्च्या लावून कार्यक्रम होत नाही. लाखोच्या संख्येने लोक उस्फुर्ततेने येतात. कोणीतरी मला विचारलं की तुमच्या या कार्यक्रमाचं मिशन काय? मी म्हणाले, आमच्याकडे मिशनही नाही आणि कमिशनही नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, “आहे का मी मंत्री? आहे का माझ्याकडे दहा पाच रुपये द्यायला? बदल्या करायला? सरकारी निधी द्यायलाही काही नाही माझ्याकडे. यालाच म्हणतात प्रेम आणि यालाच म्हणतात मुंडेंची परिक्रमा.”

“मला जीवनात काही कमी नव्हतं. खूप छान आयुष्य होतं. बाबांच्या चेहऱ्यावर उदासी दिसली आणि एका क्षणात राजकारणात प्रवेश केला. ऊन लागायचं नाही चेहऱ्याला, पायाला माती लागायची नाही. मस्त एशो-आरामात जीवन होतं. मग, बापाच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं. मला माझा पाच वर्षांचा मुलगा म्हणाला, मम्मी बाबा एकटे पडले, तू बाबांसाठी जा. मी शाळा करतो, मी माझं करतो. तू जा. असं तो म्हणाल्यावर मी घराबाहेर पडले. तेव्हापासून आजपर्यंत घराच्या बाहेरच आहे”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा >> “सत्ताधाऱ्यांनी…”, मराठा आरक्षणावरून पंकजा मुंडेंनी मांडली रोखठोक भूमिका; ओबीसी आरक्षणाचाही केला उल्लेख!

“मुंडे साहेब संकटात सापडल्यानंतर त्यांची कन्या असून त्यांची माय झाले. मी मंत्री झाले, त्यानंतर पाच वर्षे स्वचःचा चहा, पोहे देऊन लोकांना बोलावून विकासाचा निधी, ग्रामसभेत योजना, पाणीपुरवठा योजना, बदल्याही ऑनलाईन करत असताना शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन केल्या. भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यानंतरही अनेकांनी आरोप केले”, असं त्या म्हणाल्या.

“मुंडे साहेबांच्या वेळचं राजकारण वेगळं होतं, आताचं वेगळं. आता पिढी बदलली. दुसरी-तिसरी पिढी आली. आज सकाळी कोणी एकीकडे, दुपारी दुसरीकडे असतं. डोकं पागल व्हायची वेळ आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: And i entered in a politics moment recalls pankaja munde sgk