वर्षांतले सहा महिने परदेशात व सहा महिने भारतात तेही दिल्लीसारख्या मोठय़ा शहरांमध्ये राहणारे जगद्विख्यात सतारवादक रविशंकर यांचा व नगरचा संबंध येण्याचे काही कारण नव्हते. मात्र, साहित्यिक विलास गिते यांच्यामुळे तो आला. रविशंकर यांचे आज निधन झाल्यामुळे गिते यांना त्याचे स्मरण झाले. आपल्या भावना त्यांनी, तसेच प्रसिद्ध शिल्पकार- चित्रकार प्रमोद कांबळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केल्या.
गिते यांनी रविशंकर यांच्या आत्मचरित्राचा मराठीत अनुवाद केला आहे. हे पुस्तक कलकत्ता येथे प्रकाशित झाले. बंगाली भाषेचे अभ्यासक व मुख्यत: सतारप्रेमी असलेल्या गिते यांनी ते लगेचच मागवून घेतले. त्यांना ते आवडले. मराठीत ते यावे, या हेतूने त्यांनी अगदी सहज म्हणून रविशंकर यांना त्यांच्या दिल्लीतील घराच्या पत्त्यावर अनुवादासाठीच्या परवानगीचे पत्र पाठवले. सतत परदेशात असणाऱ्या रविशंकर यांचे उत्तर येईल, असे त्यांनी गृहितच धरले नव्हते.
गिते यांनी सांगितले की, त्यांना या पत्राचे उत्तर इंग्लंडहून आले. त्यावेळी रविशंकर तिथे होते. त्यांच्या सचिवाने गिते यांचे पत्र त्यांना इंग्लडला पाठवले. रविशंकर यांनी लिहिले होते की पत्र वाचून आनंद झाला. पुस्तक वाचल्याचे समाधान झाले. भेटण्याची इच्छा आहे. ते पुणे फेस्टिवलसाठी पुण्यात येणार होते. त्या तारखाही त्यांनी दिल्या. गिते यांनी पुण्यात त्यांची भेट घेतली.
सलग तासभर वेळ त्यांनी दिला. काय काय वाचले, बंगाली भाषा कशी शिकली याची माहिती घेतली. खात्री पटल्यावर एका पैशाचीही रॉयल्टी न मागता त्यांनी लगेचच पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे हक्क देऊन टाकले. पुस्तकात कोणाला दुखावणारी काही विधाने असतील तर ती परस्पर काढून टाकण्याचा अधिकारही त्यांनी दिला. एक पुस्तक पाठवा, म्हणजे रॉयल्टी मिळाली असे सांगितले.
राग अनुराग नावाच्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती नगरच्याच ललीतराज प्रकाशनचे मनोहर लांडगे यांनी प्रकाशित केली आहे. मुंबईच्या एका कार्यक्रमाला आले असताना गिते यांनी त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले. रविशंकर यांना पुस्तक आवडले, तसे त्यांनी गिते यांना सांगितले व लेखीही दिले. तेव्हापासून त्यांच्याशी मैत्र जुळले, असे गिते म्हणाले.
शिल्पकार कांबळे यांचे रविशंकर हे अत्यंत आवडते कलाकार. त्यांनी रविशंकर यांचे एक खास त्यांच्या शैलीतील स्केच केले होते. रविशंकर एकदा वेरूळ महोत्सवाला औरंगाबादला येणार होते. गिते त्या महोत्सवाला जाणार आहेत हे समजल्यावर कांबळे यांनी ते स्केच त्यांच्याबरोबर पाठवले. बरोबर दुसरेही त्यांनीच केलेले एक मोठे तैलचित्रही पाठवले. गिते यांनी रविशंकर यांना दोन्ही चित्र दाखवली. त्यातील एकावर त्यांनी कांबळे यांच्या मागणीप्रमाणे रविशंकर यांची स्वाक्षरी घेतली व दुसरे त्यांना भेट दिले. त्यांनी ते घरी लावण्यासाठी म्हणून बरोबर नेले. इतक्या मोठय़ा कलावंतांची स्वाक्षरीचे स्केच म्हणजे आपल्या संग्रहाचे वैभव आहे, अशी भावना कांबळे यांनी व्यक्त केली.
.. आणि रविशंकर यांचे चरित्र मराठीत आले
वर्षांतले सहा महिने परदेशात व सहा महिने भारतात तेही दिल्लीसारख्या मोठय़ा शहरांमध्ये राहणारे जगद्विख्यात सतारवादक रविशंकर यांचा व नगरचा संबंध येण्याचे काही कारण नव्हते. मात्र, साहित्यिक विलास गिते यांच्यामुळे तो आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-12-2012 at 04:01 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: And ravishankars biography came in marathi