विविध अडचणींमधून सोडवलेले (रेस्क्यू केलेले) वाघ मुक्त करताना नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मात्र या वाघांना अधिवास मिळत नाही आणि ते मानवी संघर्षांचे ‘शिकार’ होतात. मात्र, नागपूर वनविभागाने एका गर्भवती वाघिणीला मृत्यूच्या दाढेतून सोडवून जीवदान दिले. रेडिओ कॉलरसारख्या कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता फक्त उत्तम व्यवस्थापनाच्याच बळावर तिच्यावर पाळत ठेवली आणि तिला पुन्हा मातृत्वाचे सुख दिले. त्यामुळे मृत जंगलालाही पुनर्जीवित करता आले आणि एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच ते सहा वाघांसाठी अधिवास निर्माण झाला.
नागपूर वनविभागातील कातलाबोडी या गावातील विहिरीत ७ फेब्रुवारी २०११ला एक वाघीण पडली. मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या या वाघिणीला नागपूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाचवले. अवघ्या सात दिवसांत या वाघिणीवर उपचार करून १४ फेब्रुवारीला तिला ‘रेडिओ कॉलर’ न लावता कळमेश्वर वनपरिक्षेत्रात सोडले. मानव-वन्यजीव संघर्षांची स्थिती उद्भवते की काय, अशी परिस्थिती असताना वनअधिकाऱ्यांनी सातत्याने तिच्या हालचालींवर लक्ष्य ठेवले. नागपूर जिल्ह्याचे मानद वन्य जीवरक्षक कुंदन हाते यांनी येथील मृत जंगलाला पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परिणामी, एकेकाळी केवळ बेहडाची झाडे असलेल्या या जंगलात उत्तम गवती कुरण व नैसर्गिक जलस्रोत निर्माण केले. नीलगाय, हरणांसह इतरही वन्यप्राणी या जंगलात आज मोठय़ा प्रमाणावर आहेत. रेडिओ कॉलर न लावता सोडलेल्या या वाघिणीवर कर्मचाऱ्यांनी सातत्याने पाळत ठेवली आणि तिला मिळालेल्या जोडीदारामुळे २०१२ मध्ये तिने तीन बछडय़ांना जन्म दिला. आज या जंगलात तब्बल पाच ते सहा वाघांचा अधिवास आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा