मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नरमध्ये जाऊन एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. याच चर्चेचा आधार घेत विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोठेही भविष्य पाहिलेले नाही, असे स्पष्टीकरण शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी दिले आहे. याच प्रकरणावर आता अंधश्रद्धा निर्मूल संस्थेने (अंनिस) प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी भविष्य जाणून घेतले असेल तर आम्ही त्यांचा निषेध करतो. शिंदे यांच्यासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या नेत्याने भविष्य पाहिले असेल तर त्यातून चुकीचा संदेश जात आहे, अशी भूमिका अनिसने घेतली आहे.
हेही वाचा >>>> फडणवीसांकडून कोश्यारींची पाठराखण, मग भाजपाचा धिक्कार करणार? उदयनराजेंनी केलं स्पष्ट; म्हणाले “पक्ष बिक्ष…”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये असताना एका ठिकाणी जोतिषाकडे गेल्याची चर्चा आहे. यामध्ये तथ्य असेल तर हे अत्यंत वेदनादायी आहे. पुरोगाम महाराष्ट्रात संविधानिक पदावर बसलेल्या एकनाथ शिंदे यांचे हे वर्तन अत्यंत बेजबादारपणाचं आहे. याचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती तीव्र शब्दांत निषेध करते. ज्योतिष हे काही शास्त्र नाही. ती स्वप्न विकण्याची कला आहे. जोतिष हे थोतांड आहे, हे आम्ही वारंवार सिद्ध केलेले आहे,” असे अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले आहेत.
हेही वाचा >>>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भविष्य पाहिल्याची चर्चा, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “डॉ. नरेंद्र दाभोलकर…”
“जोतिष थोतांड नसल्याचे सिद्ध करणाऱ्याला आम्ही २१ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे यापूर्वी जाहीर केलेले आहे. मात्र हे आव्हान स्वीकारण्यास कोणीही पुढे येत नाही. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाकडे जाणे म्हणजे समाजात चुकीचा संदेश पसरविण्यासारखे आहे,” अशी प्रतिक्रिया चांदगुडे यांनी दिली आहे.
“एकनाथ शिंदे एका जोतिषाकडे सल्ला घेण्यासाठी गेल्याचे समजते. मात्र जोतिषशास्त्र हे शास्त्र नसून कोणी ते शास्त्र असल्याचे सिद्ध केले तर अनिशने २१ लाख रुपये देण्याचे यापूर्वी जाहीर केलेले आहे. मात्र अद्याप कोणीही हे आव्हान स्वीकारू शकलेले नाही. मात्र मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने अशा वैज्ञानिक दृष्टीकोन नसलेल्या गोष्टीचा आधार घेतला असेल, तर ती अंधश्रद्धाच आहे. आकाशातील गृह मानवी जीवनाव परिणाम करतात. कर्मकांड करून हा परिणाम बदलता येतो, हा दावा चुकीचा आहे,” अशी प्रतिक्रिया अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी.आर.गोराणे यांनी दिली आहे.