अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं होतं. यानंतर भाजपाने रविवारी ( १६ ऑक्टोंबर ) रात्रीपासून यावर मंथन केलं होते. अखेर सोमवारी ( १७ ऑक्टोंबर ) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मुरजी पटेल हे माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेला ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मोठा दिलासा मिळाला असून, ऋतुजा लटकेंचा निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुरजी पटेलांनी निवडणुकीतून माघारी घेतली असली, तरी अद्याप ७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी झाल्यातर त्या मशाल चिन्हावर निवडून येणाऱ्या पहिल्या शिवसेनेच्या आमदार ठरतील. मात्र, याचा सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या सुनावणीवर काही परिणाम होईल का? यावरती कायदेतज्ज्ञ अॅड. सुधाकर आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा – “काहींनी समोरून विनंती केली तर काहींनी मागून; आता राजकारणात सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात”
“ऋतुजा लटके मशाल चिन्हावर निवडून आल्यातरी सर्वोच्च न्यायालयात अथवा निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या सुनणीवर काही परिणाम होणार नाही. कारण, आयोगानेच १९६८ सालच्या अधिनियम कलम १५ नुसार चिन्ह आणि नावांचे वाटप केलं आहे. त्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं, तरच त्याच्यावर परिणाम होऊ शकतो,” असे सुधाकर आव्हाड यांनी सांगितलं.
हेही वाचा – अंधेरी निवडणुकीतून भाजपाची माघार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राज ठाकरे…”
“सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर दोन्ही गटाला चिन्ह आणि नाव देण्याबाबत ठरेल. मात्र, शिवसेनेचा एक आमदार मशाल चिन्हावर निवडून आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल,” असेही अॅड. सुधाकर आव्हाड यांनी स्पष्ट केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.