अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उमेदवार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेचा राजीनामा अद्यापही पालिकेकडून मंजूर करण्यात आला नाही. पण, राजीनामा न मंजूर करण्यासाठी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला. त्यावरून आता मनसेने शिवसेनेवर खळबळजनक आरोप केले आहेत.

मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे आणि अनिल परबांवर हल्ला केला आहे. ते म्हणाले की, “ऋतुजा लटकेंना राजीनाम्याच्या जंजाळ्यात अडकवून अंधेरीची उमेदवारी विश्वनाथ महाडेश्वरांना देण्याचा उद्धव ठाकरे, अनिल परबांचा डाव आहे. तो ऋतुजा लटकेंनी ओळखावा,” असेही मनोज चव्हाणांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – “उद्धव ठाकरे हताश, अकर्तृत्ववान, अहंकारी”, भाजपा आमदाराचा टोला; म्हणाले, “घरात बसणाऱ्यांना…”

लटकेंची उच्च न्यायालयात धाव

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदासंघात ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच, मुंबई महापालिकेला आपला राजीनामा स्वीकारण्याचे आदेश देण्याचे मागणी त्यांनी केली. उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल करायचा असल्याने न्यायालयानेही याचिकेची गुरूवारी ( १३ ऑक्टोंबर ) ठेवली आहे.

Story img Loader