अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गट-भाजपा यांच्याकडून भाजपाचे नेते मुरजी पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुरजी पटेल-ऋतुजा लटके यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना या निवडणुकीला मात्र वेगळे वळण मिळाले आहे. उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी तथा मुंबई पालिकेचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. पटेल यांनी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती शपथपत्रात दिली नाही, असा आरोप नाईक यांनी केला आहे. तसेच त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी संदीप नाईक यांनी केली आहे. या मागणीला घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असा अशी माहितीही त्यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा >> नितेश राणेंच्या ‘आईसक्रीम कोन’च्या विधानावर ठाकरे गटातील महिला नेत्या आक्रमक; म्हणाल्या “तुम्ही नागरिक म्हणून…”
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी खोटी कागदपत्रे सादर केल्यामुळे मुरजी पटेल यांच्यावर सहा वर्षांसाठी नगरसेवकपदाची निवडणूक लढवण्यावर बंदी आहे. महाराष्ट्र शासनाने तसे महापालिकेला सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्याविरोधात निकाल दिलेला आहे. भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या माणसाला निवडणूक लढवण्यासाठी कशी परवानगी दिली जाऊ शकते. निवडणूक आयोगाने मुरजी पटेल यांच्या मतदानाचा अधिकार का काढून घेतला नाही? घेतला असेल तर तो आम्हाला सांगावा, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. तसेच मुरजी पटेल यांनी पोटनिवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या शपथपत्रात काही माहिती लपवलेली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. ही माहिती त्यांनी लपवलेली आहे, असा दावा नाईक यांनी केला आहे.
हेही वाचा >> दिवाळी पहाट कार्यक्रमावरून रोहित पवारांचा शिंदे सरकारला टोला; म्हणाले, “अशा छोट्या गोष्टींसाठी…”
शिंदे गटाने या निवडणुकीसाठी उमेदवार देऊ नये, अशी आमची इच्छा होती. तसेच एखाद्या पक्षाला समर्थन द्यायचे असेल तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तीला त्यांनी समर्थन देऊ नये, असे आमचे मत होते. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्याविरोधात त्यांनी अशा माणसाला उभे केले आहे. आम्ही मुरजी पटेल यांच्या उमेदवारीविरोधात न्यायालयात जाणार आहोत. तसेच त्यांची उमेदवारी बाद करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असेही संदीप नाईक यांनी सांगितले.
हेही वाचा >> Andheri Bypoll: “पक्षाशी निष्ठावंत असलेले सगळे…” प्रचाराला सुरुवात करताच ऋतुजा लटकेंचं विधान, म्हणाल्या…
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी मला पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यास सांगितले. मी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मला मुरजी पटेल यांच्याविरोधात आक्षेप घेता आला आहे. अन्यथा मला तो अधिकार नसता, असे ठाकरे गटाचे संदीप नाईक यांनी स्पष्ट केले आहे.