अंधेरी पूर्वमधील पोटनिवडणुकीमधून भारतीय जनता पार्टीने माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केल्यानंतर राजकीय क्षेत्रामधून प्रतिक्रिया समोर येत असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या संदर्भात अकोल्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया नोंदवली.
भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी ऋतुजा लटके यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र सर्वांनी आवाहन केल्याने भाजपाने हा निर्णय घेतला असावा असं म्हटलं आहे. यावेळेस अजित पवार यांनी नांदेड आणि पंढरपूर पोटनिवडणुकीचाही दाखला दिला. “नांदेडची पोटनिवडणूक झाली, पंढरपूरला पोटनिवडणूक झाली. यावेळेचं सर्व वातावरण लक्षात घेता. दिवाळी तोंडावर आहे हे पाहता. या सर्व धावपळीच्या काळामध्ये त्यांच्या विधवा पत्नीला उमेदवारी मिळाही होती. त्याही कामाला लागल्या होत्या. त्याही घरोघरी फिरत होत्या. सर्वांनी आवाहन केल्यामुळे कदाचित हा चांगला विचार त्यांनी (भाजपाने) केला असावा,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रदेश सुकाणू समितीतील काही नेते बैठकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही भाजपा नेत्यांनी चर्चा केल्यावर आणि दिल्लीत पक्षश्रेष्ठींची परवानगी घेतल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली.शिवसेनेतील फुटीनंतर ही निवडणूक अतिशय अटीतटीची होईल, अशी अपेक्षा होती. निवडणूक लढविणार असल्याने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आणि शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठविले गेले. ठाकरे व शिंदे गटाला निवडणुकीपुरती दोन स्वतंत्र पक्षनावे व चिन्हे मिळाली.
भाजपच्या दबावामुळे शिंदे गटाने केलेल्या या हालचालींमुळे जनमानसात नाराजीचे वातावरण निर्माण झाले व ठाकरे गट आक्रमक झाला. शिंदे गटाने ठाकरे गटाच्या उमेदवार ॠतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न फसल्यावर त्यांचा महापालिका सेवेचा राजीनामा तांत्रिक मुद्द्यावर आयुक्तांवर दबाव आणून मंजूर करणे लांबविण्याचे प्रयत्न झाले. त्यातही उच्च न्यायालयाने दणका दिल्याने युतीची पंचाईत झाली होती. या सर्व नाट्यानंतरही लटकेंनी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाने माघार घेतली.