अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीवरुन राजकारण चांगलेच तापले आहेत. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई पालिकेने मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवार आज (१४ ऑक्टोंबर ) अर्ज दाखल करणार आहेत. मुरजी पटेलांचा अर्ज दाखल करण्यासाठी आलेले मंत्री दीपक केसरकर यांनी प्रसारमध्यमांशी संवाद साधला आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, “यापूर्वी २०१९ साली भाजपा आणि शिवसेना युतीला जनतेने मतदान केलं आहे. त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबर गेलो. मात्र, आता ही निवडणूक राष्ट्रवादी-काँग्रेस विरुद्ध शिवसेना-भाजप अशी आहे. शिवसेना-भाजपा युतीत जे काही निर्णय होतात, त्याची अंमलबजावणी आम्ही करतो.”
हेही वाचा – “हिंमत असेल तर समोरा समोर या”, राजन विचारेंचे मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान; म्हणाले, “पोलिसांच्या…”
अंधेरी निवडणुकीतील सहानभुतीबद्दल केसरकरांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी म्हटलं की, “सहानभुती असती तर, ही निवडणुक बिनविरोध होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला असता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मन मोठं आहे. काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजीत कदम यांना शिवसेना आणि भाजपाने पाठिंबा दिला होता. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यासाठी पुढे यावे लागते, सर्वांना एकत्र येण्याची विनंती करावी लागते,” असेही दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे.