आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्ह्य़ातील रिक्षाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रामुख्याने जिल्हय़ातील रस्त्यांवर राजरोसपणे फिरत असलेल्या अनधिकृत रिक्षांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी रिक्षाचालक युनियनने केली आहे.
जिल्हय़ातील अनधिकृत रिक्षावर कारवाई करा, या मागणीसाठी पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला आजवर तीन निवेदन दिली आहेत. मात्र तरीही प्रादेशिक परिवहन विभागाने कुठलीही कारवाई केलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन हताश झालेल्या रिक्षाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
जिल्ह्य़ात तीनशे ते चारशे अनधिकृत रिक्षा रस्त्यावर धावत आहे. शासनाचे कर आणि परवाना फी चुकवून राजरोसपणे हे प्रवासी वाहतूक करीत आहेत. यामुळे परवानाधारक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही ठिकाणी खासगी परवाना घेऊन रिक्षाचा प्रवासी वापर केला जातो आहे. एकाच नावावर दोन परवाने दिले जात आहेत. तर एका परवान्यावर दोन रिक्षा धावत आहेत. अनेकदा स्क्रप करण्यात आलेल्या रिक्षा बनावट नंबर टाकून चालवल्या जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परवानाधारक रिक्षाचालकांचे नुकसान होत आहे. बेकायदेशीर रिक्षावरील कारवाईत पोलीस विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागात समन्वय असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अशा बेकायदेशीर रिक्षांवर कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे  अलिबाग ऑटोरिक्षा व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी बेकायदेशीर रिक्षांवर कारवाई करा, यासाठी पेणच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे पाटील यांनी जिल्हाधिकारी एच. के. जावळे यांना सांगितले. मात्र प्रत्येक वेळी कोरडय़ा आश्वासनापलीकडे त्यांनी काहीच केले नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

Story img Loader